इंझोरी : पिंपळगाव - इंझोरीदरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल दोन वर्षांपूर्वी अवकाळी पावसामुळे वाहून गेला. यामुळे शेतकऱ्यांना शेतात वाहने नेण्यात अडचणी येत आहेत. लोकमतने यासंदर्भात वारंवार वृत्त प्रकाशित केल्यानंतर आमदारांनी विधानसभेत या पुलाबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल शासनाने घेतल्याने तीन विभागांकडून पाहणीही करण्यात आली; परंतु अद्यापही या पुलाचे काम झाले नाही.
मानोरा तालुक्यातील म्हसणीनजीक १९७२ मध्ये अडाण प्रकल्पाची उभारणी करण्यात आली. या प्रकल्पामुळे इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावर नाल्याचे पाणी वाढल्याने हा रस्ता पाण्यात जाऊन शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. या रस्त्यावर शेती असलेल्या इंझोरी येथील ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांना या समस्येचा सामना करावा लागत होता. त्यामुळे या पाणंद रस्त्यावर पूल उभारण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांना प्रशासनाकडे पाठपुरावा करावा लागला, आंदोलन उभारावे लागले. त्यानंतर या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने पूल बांधला. त्यामुळे शेतकऱ्यांना सुविधा झाली. तथापि, २०१९ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या अखेर आणि नोव्हेंबरच्या सुरुवातीस धो धो कोसळलेल्या अवकाळी पावसामुळे हा पूलच वाहून गेला. त्यामुळे या रस्त्यावर शेती असलेल्या ३० पेक्षा अधिक शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली. लोकमतने वारंवार वृत्त प्रकाशित करून शेतकऱ्यांची समस्या उजागर केली. त्यानंतर आमदारांनी विधिमंडळात याबाबत तारांकित प्रश्न केला. त्याची दखल घेत शासनाने या पुलाची पाहणी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार यवतमाळ जलसंधारण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग मंगरुळपीर आणि जि.प. बांधकाम विभागाच्या पथकाने या पुलाची पाहणी केली; परंतु हा पूल आमच्या कार्यक्षेत्रात नसल्याचे तिन्ही विभागांचे मत असल्याने या पुलाचे काम अद्यापही होऊ शकले नाही.
.---------------------
बियाणे, खतांची डोक्यावरून वाहतूक
इंझोरी-पिंपळगाव दरम्यानच्या पाणंद रस्त्यावरील पूल अवकाळी पावसामुळे वाहून गेल्यानंतर या रस्त्यावरून बैलगाडी, ट्रॅक्टरसारखी वाहने नेणेच काय, तर पायी जाणेही कठीण होऊन बसले आहे. त्यामुळे आता खरीप हंगामात पेरणीसाठी बियाणे, खतांसह इतर कामांसाठी आवश्यक साहित्य डोक्यावर न्यावे लागत आहे. गेल्या खरीप हंगामानंतर रबी हंगामातही या मार्गावरील शेतकऱ्यांना महिनाभर हा त्रास सहन करावा लागला होता.
-----------------
पुनर्वसन विभागाची उदासीनता
अडाण प्रकल्पाच्या निर्मितीमुळे इंझोरी-पिंपळगाव रस्ता पाण्यात गेला होता. यामुळे शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली आणि शेतकऱ्यांनी पाठपुरावा केल्याने या रस्त्यावर पुनर्वसन विभागाने १५ वर्षांपूर्वी येथे पुलाची उभारणी केली. आता हा पूल पावसामुळे खचल्याने शेतकऱ्यांची वहिवाट बंद झाली असली तरी, पुनर्वसन विभागाने मात्र गत २ वर्षांपासून या पुलाच्या स्थितीची पाहणीसुद्धा केलेली नाही.
===Photopath===
170621\17wsm_2_17062021_35.jpg
===Caption===
तारांकित प्रश्नानंतरही खचलेल्या पुलाचा प्रश्न कायमच !