लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: जिल्ह्यात नाफेड अंतर्गत तूर खरेदीसाठी दीड महिन्यांपूर्वी आदेश प्राप्त झाल्यानंतर तीन ठिकाणी खरेदी सुरू झाली. तथापि, या खरेदीसाठी नोंदणीची अंतिम मुदत २० मार्च असताना वाशिम, मानोऱ्यात अद्याप एकाही शेतकऱ्यांची नोंदणी झाली नाही. आठवडाभरापूर्वी वाशिम येथे खरेदीसाठी एका संस्थेला कंत्राट दिले असतानाही अद्याप येथे नोंदणी सुरू झाली नाही, तर मानोऱ्यात ऐनवेळी खरेदी विक्री संस्थेने खरेदीस नकार दिल्यामुळे येथे खरेदीची शक्यताच मावळली आहे.बाजार समित्यांत गेल्या दोन महिन्यांपासून तुरीचे दर कोसळत असताना शेतकऱ्यांकडून शासकीय खरेदी सुरू करण्याची मागणी करण्यात येत होती. या पृष्ठभुमीवर जिल्ह्यात दीड महिन्यापूर्वी तूर खरेदीसाठी शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली. त्यात मंगरुळपीर, मालेगाव आणि मानोरा येथे खरेदीसाठी काही संस्थानी पुढाकार दिल्याने येथील नोंदणी आणि खरेदी प्रक्रियाही सुरू झाली. त्याशिवाय रिसोड येथे खरेदी विक्री संस्थेने तयारी दर्शविल्यानंतर शेतकºयांची नोंदणी करण्यात आली; परंतु नाफेडच्या अटीमुळे त्यांनी खरेदीस नकार दिला, तर मानोरा आणि वाशिम येथे दहा दिवसांपूर्वी दोन संस्थांना खरेदीचा परवाना देणारे पत्र जिल्हा पणन अधिकाºयांनी दिले; परंतु या खरेदीसाठी शेतकºयांच्या नोंदणीची मुदत २० मार्च असताना वाशिम आणि मानोरा येथे १९ मार्चपर्यंतही नोंदणी प्रक्रिया सुरू झाली नाही, तर मानोरा येथे खरेदी विक्री संस्थेने खरेदी करणार नसल्याचे पत्र जिल्हा पणन अधिकाºयांना दिले. त्यामुळे मानोरा येथे तूर खरेदीच होणार नसल्याचे स्पष्ट झाले, तर वाशिम येथे शेतकºयांची २० मार्च रोजी नोंदणी होणार असल्याचे जिल्हा पणन अधिकाºयांनी स्पष्ट केले. नाफेडच्या खरेदीची ही स्थिती पाहता वाशिम आणि मानोरा येथील शेतकºयांना या खरेदीचा फायदाच होणार नसल्याचेही स्पष्ट होत आहे. रिसोडच्या खरेदीसाठी दुसऱ्या संस्थेची निवडशासकीय तूर खरेदीसाठी मालाचा दर्जा निश्चित करण्याची अट अडचणीची असल्याचे सांगत रिसोड खरेदी विक्री संस्थेने खरेदीस नकार दिला आणि तसे पत्रही जिल्हा पणन अधिकाºयांना दिले आणि जाहीर सुचनाही प्रसिद्ध केली. त्यामुळे रिसोड येथे २०० शेतकºयांची नोंदणी होऊनही खरेदी अद्याप सुरुच झाली नाही. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाची लाट उसळली आहे. अशात या ठिकाणी खरेदीसाठी वाशिम तालुक्यातील अनसिंगच्या विदर्भ कृषी प्रक्रिया संस्थेने तयारी दर्शविल्यानंतर या संस्थेकडे रिसोडच्या खरेदीची जबाबदारी सोपविण्यात आली. तथापि, अद्यापही या संस्थेकडून खरेदी सुरू झालेली नाही. वाशिम येथे एक दिवसाच्या नोंदणीचीच खरेदी वाशिम येथील खरेदीसाठी उमरा कापसे येथील जय गजानन महाराज कृषी प्रक्रिया संस्थेची निवड झाली असली तरी, या संस्थेकडून अंतिम मुदतीच्या पूर्वसंध्येपर्यंत अर्थात १९ मार्चपर्यंतही शेतकºयांची आॅनलाईन नोंदणी करण्यात आली नाही. याबाबत जिल्हा पणन अधिकाºयांशी संपर्क साधून माहिती घेतली असता २० मार्च रोजी येथे नोंदणी होणार असून, या दिवशी जेवढी नोंदणी होईल. तेवढ्याच शेतकºयांकडून तुरीची मोजणी करून घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यातही २० मार्च रोजी होळीचा सण असल्याने या दिवशी नोंदणी होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मुदत संपत आली तरी तूर खरेदीसाठी नोंदणीच नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2019 2:32 PM