मालेगाव : छत्रपती शिवरायांनी सर्व जातीधर्मांतील लोकांना सोबत घेऊन स्वराज्य स्थापन केले व त्यांना 'मावळे' हे सर्वसमावेशक नाव दिले. याच मावळ्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावून स्वराज्याची पताका अभिमानाने फडकवली. मावळ्यांच्या रक्तातून उभे राहिलेले हे स्वराज्य प्रचंड महत्त्वाकांक्षा व लाखो सैन्य घेऊन आलेल्या औरंगजेबासारख्या बलाढ्य शत्रूलासुद्धा जिंकता आले नाही, असे प्रतिपादन प्रसिद्ध व्याख्याते प्रा. भरत आव्हाळे यांनी मालेगाव येथे शिवजयंतीनिमित्त व्यक्त केले.
सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने व मराठा सेवा संघाच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज यांची वजयंती कोरोना संबंधीचे नियम पाळून मालेगाव येथील नगरपंचायत सभागृहात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साध्या पद्धतीने ही शिवजयंती शिवप्रेमींनी साजरी केली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य वसंतराव अवचार हे होते . तसेच नगर पंचायतचे सीईओ डॉ. विकास खंडारे, गोपाल पाटील राऊत, प्रा अनंत गायकवाड, प्रा. आनंद देवळे, अनिल गवळी, कल्पना कढणे, गीता रंजवे, यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वप्रथम जिजाऊ वंदना घेऊन कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ व शिवरायांच्या प्रतिमांचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ. विकास खंडारे, प्रशांत वाझुळकर, श्रीराम अवचार, जगन्नाथ रंजवे, प्रा. राजाराम वामन, प्रवीण पाटील, अनिल वाघ, प्रा विजय भोयर, जगदीश भालेराव, सतीश कुटे, प्रशांत डहाळे , संध्या आव्हाळे, कामिनी अवचार आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यकमाचे संचालन नागेश कव्हर यांनी प्रास्ताविक मनोज वाझुळकर यांनी तर आभार प्रदर्शन भागवत मापारी यांनी केले .