लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : प्रत्येक वाहनधारकाचा प्रवास सुरक्षित व सुकर होण्यासाठीच वाहतूक विषयक नियम व कायदे बनविले गेले आहेत. या नियमांचे पालन करणे हे प्रत्येकाचे कर्त्यव्य आहे. वाहतूक नियमांच्या पालनाची सुरुवात प्रत्येकाने आपल्या कुटुंबापासून करावी, असे आवाहन आमदार राजेंद्र पाटणी यांनी केले. वाशिम उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्यावतीने आयोजित ३१ वा रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.यावेळी जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तानाजी नरळे, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी जिल्हाधिकारी मोडक म्हणाले, रस्ता सुरक्षा हा अतिशय महत्वाचा विषय आहे, त्यामुळे याविषयी जनजागृतीसाठी रस्ता सुरक्षा सप्ताह देशभर राबविला जात आहे. अतिशय क्षुल्लक कारणांसाठी वाहतूक नियम तोडून वेगाने वाहने चालविणे, सिग्नल तोडणे यासारखे प्रकार केले जातात. वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यामुळे होणारे अपघात अनेकदा आपल्या व इतरांच्याही जीवावर बेतू शकतात. त्यामुळे नागरिकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. पोलीस अधीक्षक परदेशी म्हणाले की, रस्त्यावर वाहन चालवताना होणारी एक चूक वाहनधारकाच्या जीवावर बेतते. त्यामुळे रस्ता सुरक्षेसाठी वाहतूक नियमांचे पालन सर्वांनी करणे आवश्यक आहे. प्रास्ताविक प्रभारी उप प्रादेशिक परिवहन अधिकारी समरीन सय्यद यांनी केले. यावेळी त्यांनी रस्ता सुरक्षा अभियानाच्या आयोजनाचा हेतू सांगितला. तसेच ११ ते १७ जानेवारी या कालावधीत आयोजित करण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली. वाहतूक नियमांविषयी जनजागृती करण्यासाठी तयार करण्यात आलेल्या सेल्फी पॉईंटचे यावेळी मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. तसेच वाहतूक नियमांची माहिती देणारी भिंतीपत्रके, घडीपुस्तिका यांचे विमोचन करुन वाहनांना रिफ्लेक्टर लावण्यात आले. हेल्मेटचे महत्व पटवून देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या मोटारसायकल रॅलीला यावेळी उपस्थितांनी हिरवी झेंडी दाखविली. बाकलीवाल विद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी यावेळी रस्ता सुरक्षा विषयी पथनाट्य सादर करून वाहतूक नियमांविषयी जनजागृती केली. यावेळी सेल्फी पॉईंट, बाईक रॅली आकर्षण ठरली.
प्रत्येकाने वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज - पाटणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2020 4:50 PM