कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढविणे आणि खबरदारी घेणे, हे प्रभावी उपाय आहेत. कोरोना संसर्ग होऊ नये म्हणून आरोग्यदायी जीवनशैली हा प्रभावी मंत्र आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातून शरीराला झेपावेल असा नियमित व्यायाम करावा. आहारावर विशेष भर द्यावा. बाहेरील खाद्यपदार्थाचे सेवन करण्याचे टाळावे. घरात बनविलेल्या पदार्थांचे सेवन करण्यास प्राधान्य द्यावे. तसेच शीतपेये, थंड खाद्यपदार्थ पूर्णपणे टाळावे. शरीरात कफ होऊ नये म्हणून अधूनमधून पिण्यासाठी गरम पाण्याचाही वापर करावा. सर्दी, ताप, खोकला, तोंडाची चव जाणे यासारखी काही लक्षणे जाणवली तरी अवश्य कोरोना चाचणी करावी. वेळीच उपचार मिळाल्याने रुग्ण हा या आजारातून पूर्णपणे बरा होऊ शकतो. उपचारास विलंब झाला तर हा आजार अजून वाढतो. तसेच त्यामुळे कुटुंबातील अन्य सदस्यदेखील बाधित होण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे तत्काळ चाचणी आणि बाधित असल्याचे समजल्यावर तत्काळ उपचार हाच त्यावरील प्रभावी उपाय आहे. कोरोनाबाधित रुग्णांना मानसिक आधाराची गरज असून, या कालावधीत सोशल मीडियाच्या माध्यमातून रुग्णाशी संपर्क साधून त्याला मानसिक आधार द्यावा.
-डॉ. अनिल कावरखे,
अध्यक्ष, आयएमए
सर्व मिळून सामना करू
कोरोनावर मात करण्यासाठी आरोग्य यंत्रणा आणि नागरिकांना एकत्रितपणे प्रयत्न करणे गरजेचे आहे.
कोरोना आजाराबाबत कुणीही अजिबात भीती बाळगू नये, घरात राहणाऱ्यांनी प्रसन्न मन ठेवावे. तसेच अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडावे. वयस्क नागरिक आणि लहान मुलांनी गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.