लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : आरोग्य मंत्रालयाने राज्यातील केवळ एकाच जिल्ह्यात ट्रायल रन घेण्याचे ठरविले होते; परंतु त्यामध्ये वाढ करून आम्ही आता चार जिल्ह्यांचा समावेश केला आहे. प्रथम अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना आणि त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले.शहरातील बालाजी मंदिर येथे १ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजता मंत्री राजेश टोपे यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्यासमवेत विधीवत पूजा केली. यावेळी ते बोलत होते. २०२० हे वर्ष कोरोनाग्रस्त होते; मात्र नवीन वर्ष कोरोनामुक्त व्हावे, अशी देवाकडे प्रार्थना केली. कोरोनाविरोधात सरकार सर्वतोपरी प्रयत्न करीत असून २ जानेवारी रोजी राज्यातील चार जिल्ह्यात ट्राय रनचे आयोजन करण्यात आले आहे. आरोग्य मंत्रालयाने राज्यातील केवळ एकाच जिल्ह्यात सदर उपक्रम घेण्याचे ठरविले होते. आता त्यात वाढ करून चार जिल्ह्यांचा समावेश केला. 'ड्राय रन'च्या माध्यमातून लससंदर्भात जनजागृती करण्यात येणार आहे. प्रथमत: यामध्ये अत्यावश्यक सेवा देणाऱ्यांना प्राधान्य राहील. त्यानंतर टप्याटप्याने सर्वांनाच कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. यासंदर्भात 'सिरम' व 'बायोटेक'ला परवानगी देण्याबाबत केंद्राकडे प्रस्ताव सादर केलेला आहे, असे ते म्हणाले. यावेळी सरपंच संघटनेचे चंद्रकांत पाकधने, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, भास्कर पाटील शेगीकर, जुगलकिशोर कोठारी, सचिन रोकडे यांच्यासह आरोग्य विभागाचे अधिकारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
आरोग्यमंत्र्यांनी पोहरादेवीतही घेतले दर्शनआरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी नववर्षानिमित्त १ जानेवारी रोजी पोहरादेवी संस्थानला भेट दिली. तसेच महान तपस्वी स्वर्गीय संत रामराव महाराज यांच्या समाधीचे दर्शन घेतले.