कारंजा : माजी सैनिक बहुउद्देशीय संघ, कारंजा लाडचे सैनिक विश्वकल्याण शेतकरी गट व पाटील मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने कृषी विज्ञान केंद्र, वाशिम व कृषी विभाग, कारंजा लाड यांच्या विशेष सहकार्याने ११ जानेवारी रोजी कृषी तंत्रज्ञावर आधारित माजी सैनिक व शास्त्रज्ञ संवाद कार्यक्रम कोळी कारंजा लाड येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान कृषी विज्ञान केंद्र, वाशिमचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रवींद्र काळे यांनी भूषविले. यावेळी विषय विशेषज्ञ तुषार देशमुख, कृषी विभाग, कारंजाचे मंडल कृषी अधिकारी संजय चौधरी, ठाकरे, देशकर आणि माजी प्राचार्य प्रा. अविनाश मुधोळकर उपस्थित हाेते.
या कार्यक्रमाच्या मार्गदर्शन सत्रात तुषार देशमुख यांनी बदलत्या हवामानाचा पिकावर होणारा परिणाम, सुधारित बियाण्याची वाणे, हवामानानुसार कीडरोगनाशक प्रयोग, बीजप्रक्रियेचे महत्त्व तसेच शाश्वत शेतीसह भारतीय मौसम विज्ञान विभागद्वारे निर्मित ‘मेघदूत’ ह्या मोबाईल ॲपद्वारे शेतकरी हवामानाचा तत्काळ सल्ला, वापर तसेच शेतकरी उत्पादक प्रक्रिया उद्योग गट कंपनी संकल्पना याची माहिती दिली. संजय चौधरी यांनी शेतकऱ्यांना कृषी विभागाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली. प्रा. अविनाश मुधोळकर यांनी शेतमाल प्रक्रिया मूल्यवर्धनाचे महत्त्व सांगितले. कारंजा सैनिक शेतकरी गटाचे अध्यक्ष कॅप्टन अतुल एकघरे यांनी माजी सैनिक व शेती व्यवसायाबद्दल मनोगत व्यक्त करून भविष्यातील शेतीबाबत मार्गदर्शन केले. अध्यक्षीय मनोगतात डॉ. रवींद्र काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राचे उद्देश, कार्य, उपक्रम व सेवा, एकात्मिक शेतीचा मानवी आरोग्य व माती आरोग्य संबंध याबाबत विशेष मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संचालक ओमप्रकाश देशकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रमेश ठाकरे, कृषी हवामान निरीक्षक एस. एम. बोदडे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला कारंजा येथील सर्व माज़ी सैनिक शेतकरी व ग्रामीण भागातील शेतकऱी उपस्थित होते.