लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : माजी सैनिक मेळाव्याच्या निमित्ताने शनिवारी जिल्हा प्रशासनातर्फे माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी, वीरमातांचा सत्कार सोहळा घेण्यात आला.याप्रसंगी जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, अपर जिल्हाधिकारी डी. एस. वानखेडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी रत्नाकांत चरळे, कल्याण संघटक संजय देशपांडे आदी उपस्थित होते. सर्वप्रथम स्मृतिचिन्ह व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी म्हणाले, की निसर्गाने तयार केलेल्या बिकट परिस्थितीचा सामना करत परकीय आक्रमणांपासून आपल्या देशांचे संरक्षण करणारे भारतीय सैनिक हे देशातील प्रत्येक नागरिकांचे आदर्श असायला हवेत. कितीही बिकट परिस्थिती असली, तरी प्रत्येक काम अतिशय शिस्तबद्धपणे कसे पूर्ण करावे, हे नागरी सेवेतील अधिकारी, कर्मचारी व नागरिकाने भारतीय सैनिकांकडून शिकले पाहिजे, असे मत द्विवेदी यांनी व्यक्त केले. देशाचे संरक्षण, सन्मान, कल्याण याला प्रथम प्राधान्य हे भारतीय सैन्याचे ब्रीद आहे. भारतीय सैनिकांकडून केल्या जाणाºया देशसेवेची तुलना इतर कोणाशीही करता येणार नाही. आपल्या सैनिकांकडे पराक्रम घडविण्याच्या धाडसाबरोबरच बंधुभाव, आपुलकी आहे. त्यामुळे आपले सैन्य जगातील इतर देशांच्या सैन्यांपेक्षा श्रेष्ठ ठरते. कारगिल युद्ध तसेच इतर युद्धातही भारतीय सैनिकांनी आपल्या पराक्रमाबरोबरच माणुसकीचे दर्शनही जगाला घडविले असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.प्रास्ताविकातून जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी चरळे यांनी सांगितले, की कारगिल विजय हा भारतीय सैन्य दलाबरोबरच प्रत्येक भारतीयांना कायम प्रेरणा देणारा आहे. जिल्हा सैनिक कार्यालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहितीही त्यांनी यावेळी दिली.यावेळी शांताबाई सरकटे, पार्वती लहाने या वीरपत्नी, २००८ रोजी कारगिल येथे कार्यरत असताना दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात जखमी झालेले सुभेदार प्रल्हाद आंधळे, २०१३ मध्ये जम्मू काश्मीर येथे शोध व वर्चस्व मोहिमेदरम्यान जखमी झाल्याने दिव्यांगत्व आलेले लान्स नायक विशाल वाघमारे यांच्यासह शहीद विधवा, वीरमाता यांचा जिल्हाधिकारी द्विवेदी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच माजी सैनिक पाल्यांना विविध योजनांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अर्थसहाय्याचे वितरण करण्यात आले. संचालन प्रा. गजानन वाघ यांनी, तर आभार सिद्धेश्वर इंगळे यांनी मानले. देशाचे संरक्षण करताना शहीद झालेल्या सैनिकांना यावेळी श्रद्धांजली वाहण्यात आली. भारतीय सैन्य दलातील सेवेदरम्यान जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयातील कल्याण संघटक संजय देशपांडे यांना उत्कृष्ट कामगारीबद्दल मानद कप्तान पदवी बहाल करण्यात आली होती. गत चार वर्षांपासून त्यांनी वाशिम जिल्हा सैनिक कार्यालयामध्ये कल्याण संघटक म्हणून आपली सेवा दिली आहे. यावेळी त्यांचाही सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
माजी सैनिक, वीरमातांचा सत्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 1:35 AM
वाशिम : माजी सैनिक मेळाव्याच्या निमित्ताने शनिवारी जिल्हा प्रशासनातर्फे माजी सैनिक, शहीद सैनिकांच्या पत्नी, वीरमातांचा सत्कार सोहळा घेण्यात आला.
ठळक मुद्देमाजी सैनिक मेळावा : जिल्हा प्रशासनाचा पुढाकार