वाशिम : संतुलित पाण्यामुळे मानवी आरोग्यावर कोणताही परिणाम होत नाही; परंतु आवश्यकतेपेक्षा कमी किंवा जास्त पाणी प्यायल्यास त्याचे परिणाम हळूहळू जाणवू लागतात. त्यामुळे शरीराची गरज, वातावरण या सर्व बाबी लक्षात घेऊनच पाणी प्राशन करावे, असा सल्ला तज्ज्ञ डॉक्टरांनी दिला.
पाणी ही शरीराची अत्यावश्यक गरज असून, पाण्याशिवाय माणूस जिवंत राहूच शकत नाही. त्यामुळे शरीराला जेवढे पाणी आवश्यक आहे, तेवढे पाणी प्रत्येक नागरिकाने पिणे आवश्यक आहे. मात्र, आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्यायल्यास जसे शरीराचे नुकसान होते, तसेच जास्तीचे पाणी पिणेसुद्धा आरोग्याला धोकादायक ठरू शकते. पाणी कमी पिल्याने जसा डिहायड्रेशनचा धोका वाढतो, तसेच शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले, तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. कोणत्या वयोगटातील नागरिकांनी दिवसाला साधारणत: किती लिटर पाणी प्यावे, याबाबत आरोग्य विभागाच्या मार्गदर्शक सूचना असून, त्यानुसार पाणी प्राशन केले, तर आरोग्यही चांगले राहू शकते, असा सल्ला डॉक्टरांनी दिला.
०००००००००
कोणी किती पाणी प्यावे
वयोगट दिवसाला किती पाणी (लिटर)
० ते ६ महिनेआवश्यकता नाही
६ महिने ते १ वर्षे २५० मिलिलिटर
१ ते ३ वर्ष १ लिटर
४ ते ८ वर्षे १.२ लिटर
९ ते १३ वर्षे १.८ लिटर
१४ ते १८ वर्षे २.५ लिटर
१८ वर्षांवरील ३ लिटर
......................
कमी पाणी प्यायले तर...
शरीराला आवश्यकतेपेक्षा कमी पाणी प्राशन केले, तर डोके दुखणे, चक्कर येणे, डिहायड्रेशन, लघवी कमी होणे, ओठ व त्वचा कोरडी पडणे, रक्तदाब कमी होण्याची शक्यता, बद्धकोष्ठता होणे आदी लक्षणे दिसून येतात. पाणी कमी प्राशन केल्यामुळे शरीराचे नुकसान होऊ शकते.
..................
शरीरात पाणी जास्त झाले तर...
साधारणत: नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी पितो. मेंदूचा आजार, किडनी रुग्णांनी कमी पाणी पिणे आवश्यक आहे. शरीरातील पाण्याचे प्रमाण वाढले, तर ओव्हर-हायड्रेशनचा त्रास जाणवू शकतो. ओव्हर-हायड्रेशनचा थेट परिणाम मूत्रपिंडावर होतो.
..................
कोट
नॉर्मल मनुष्य आवश्यकतेनुसार पाणी प्राशन करतो. ही समस्या मानसिक रुग्ण, मेंदूशी संबंधित आजार असलेल्या रुग्णांमध्ये जाणवते. पाण्याचे जास्त प्राशन केल्यामुळे शरीरातील सोडियमचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो.
-डॉ. सिद्धार्थ देवळे,
एमडी (मेडिसिन) वाशिम
......
निरोगी शरीरासाठी दिवसातून अडीच ते साडेतीन लिटरदरम्यान पाणी पुरेसे आहे. आवश्यकतेनुसार पाणी पिले, तर कोणतीची समस्या उद्भवत नाही. आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात पाणी पिले, तर ओव्हर-हायड्रेशन होण्याचा धोका संभवतो.
-डॉ. वैभव गाभणे,
एमडी (मेडिसिन) वाशिम