ताजी फळे व भाजीपाल्याचा आहारात समावेश असणे हे आरोग्यदायी मानले जाते; परंतु विषारी रासायनिक कीडनाशकांचा अमर्याद वापर या फळावर व भाजीपाल्याच्या पिकावर झाला असेल व विशेषत: या फळ व भाजीपाला पिकावर पीक काढणीच्या वेळी या रासायनिक कीडनाशकांचे अंश हे कीडनाशक अवशेषांच्या कमाल अवशेष मर्यादेच्या बाहेर (एम.आर.एल.) शिल्लक राहिल्यास हा भाजीपाला व फळे खाणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकतो. हे टाळण्यासाठी, सुरक्षित अन्नासाठी कीडनाशक वापरानंतर कमाल अवशेष मर्यादेपर्यंत पोहोचून पीक काढणीसाठी प्रतीक्षा कालावधी कीटकशास्त्रज्ञांनी काढून दिलेला आहे. रासायनिक कीडनाशकांच्या फवारण्यानंतर संबंधित पिकात संबंधित कीडनाशक फवारल्यानंतर पाळावयाचा प्रतीक्षा कालावधी साधारणपणे संबंधित कीडनाशकाच्या लेबलवर अथवा माहिती पत्रिकेवर दिलेला असतो. पीकवार कीडनाशकाच्या वापरानंतर कमाल अवशेष मर्यादा व पीक काढणीसाठीचा प्रतीक्षा कालावधी याचा शेतकऱ्यांनी गरजेनुसार संदर्भ घ्यावा व आपल्या आहारात जाणाऱ्या विविध फळे व भाजीपाला पिकात कीडनाशकांचे कमीत कमी अंश राहतील याची काळजी घ्यावी, असा सल्ला डवरे यांनी दिला.
बॉक्स
कीडनाशकांचे कमीत कमी अंश राहतील या दृष्टिकोनातून घ्यावयाची काळजी
१) कीडनाशकाचा वापर संबंधित पिकातील संबंधित किडीचे योग्य निदान करून अधिकृत केंद्रीय कीडनाशक मंडळ व नोंदणी समिती यांच्या शिफारशीनुसारच व कीडनाशक उत्पादनाचे लेबल क्लेम काळजीपूर्वक वाचूनच करावा.
२) रासायनिक कीडनाशके फवारल्यानंतर संबंधित पिकातील शिफारस केलेला काढणीपूर्व कालावधी उलटल्यानंतरच त्याची काढणी करावी.
३) शक्यतोवर रासायनिक कीडनाशकांचा वापर पिकाच्या वाढीच्या सुरुवातीच्या काळात करावा आणि पीक काढणीच्या काळात जैविक किंवा वनस्पतीजन्य कीडनाशकाला प्राधान्य द्यावे.
४) फळे व भाजीपाला पिके काढणीयोग्य झाल्यावर काढणीपूर्वी एक ते दीड महिना अगोदर रासायनिक कीडनाशकांच्या ऐवजी वनस्पतीजन्य व जैविक कीडनाशके यांचा वापर करणे योग्य; परंतु रासायनिक कीडनाशके वापरायचे झाल्यास पीक काढणीपूर्व प्रतीक्षा कालावधी लक्षात घ्यावा व लेबल क्लेम शिफारशीप्रमाणे कीडनाशके वापरावी.
५) रासायनिक कीडनाशके वापरताना ज्या कीडनाशकाच्या वापरावर बंदी आहे, ती कीडनाशके वापरू नयेत तसेच मानवी आरोग्यास व पर्यावरणास कमी हानिकारक असलेली, कमी मात्रेमध्ये लागणारी व अद्ययावत लेबल क्लेम शिफारस असलेली परिणामकारक कीडनाशके योग्य प्रमाणात, योग्य वेळी प्रत्यक्ष तज्ज्ञांचा सल्ला घेऊन वापरावी.
६) शेतकऱ्यांनी आपल्या घरी फळे व भाजीपाला आणल्यानंतर साधारणत: एक ते दोन टक्के मिठाचे द्रावण तयार करून त्या द्रावणात फळे व भाजीपाला टाकून नंतर स्वच्छ पाण्याने धुऊन घ्यावा. त्यामुळे रासायनिक कीडनाशकांचे अवशेष कमी होण्यास मदत होते.