वाशिम : कोरोनाबाधितांवर उपचार करताना वापरल्या जाणारे रेमडेसिविर इंजेक्शन आपल्या रुग्णालाही मिळावे, यासाठी नातेवाइकांचा आग्रह असतो. रेमडेसिविर इंजेक्शनचा योग्य वापर होणे आवश्यक आहे. यासाठी ‘आयसीएमआर’ व राज्यस्तरीय टास्क फोर्सच्या दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक असल्याचे मत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, ‘आयएमए’चे अध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी व्यक्त केले. खासगी डॉक्टरांशी चर्चा करताना सरकारी डॉक्टरांनी शनिवारी मार्गदर्शक सूचना जारी केल्या.
डॉ. राठोड यांच्या मतानुसार, रेमडेसिविर इंजेक्शन कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी साहाय्यभूत ठरत असले तरी ते कोणत्या रुग्णांना द्यावे, याबाबत जागतिक आरोग्य संघटना तसेच ‘आयसीएमआर’ व राज्यस्तरीय टास्क फोर्सने काही दिशानिर्देश जारी केले आहेत. यानुसार ‘आरटीपीसीआर’ चाचणीत कोरोनाबाधित आढळलेल्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी ९४ पेक्षा कमी आढळल्यास त्याची आरोग्यस्थिती पाहून त्याला रेमडेसिविर इंजेक्शन देण्याचा निर्णय संबंधित कोविड रुग्णालयाचे डॉक्टर घेऊ शकतात, पण कोरोना चाचणी न करता केवळ ‘एचआरसीटी’ चाचणीच्या आधारे किंवा कोरोना चाचणी निगेटिव्ह असलेल्या रुग्णांनासुद्धा हे इंजेक्शन देण्याचा आग्रह नातेवाइकांकडून होतो, हे पूर्णतः चुकीचे आहे. तसेच ज्या बाधिताला कोरोनाची लक्षणे नाहीत किंवा सौम्य लक्षणे आहेत. मात्र, शरीरातील ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा अधिक आहे, अशा रुग्णांनासुद्धा रेमडेसिविर इंजेक्शन देण्याची आवश्यकता नसते. त्यामुळे नातेवाइकांनी तसेच संबंधित डॉक्टरांनीसुद्धा ‘आयसीएमआर’च्या दिशानिर्देशाचे पालन करूनच रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर करणे बंधनकारक आहे, असे डॉ. राठोड म्हणाले.
डॉ. आहेर म्हणतात, राज्यस्तरीय टास्क फोर्स यांनी ‘आयसीएमआर’च्या दिशानिर्देशानुसार रेमडेसिवीर इंजेक्शनचा वापर केव्हा करावा, याविषयी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार मध्यम व तीव्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या रक्ताची तपासणी (जसे की, डी डायमर, सी-रिऍक्टिव्ह प्रोटिन, एलडीएच, सिरम फेरिटीन) करून, तसेच ‘एचआरसीटी’ चाचणीचे गुणांकन (स्कोर) ९ पेक्षा अधिक असल्यास या रुग्णास रेमडेसिविर इंजेक्शन देण्याबाबत सुचविण्यात आले आहे. लक्षणे नसलेल्या अथवा सौम्य लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांवरील उपचारासाठी या इंजेक्शनचा उपयोग होत नसल्याचे अनके तज्ज्ञांचे मत आहे. शरीरातील ऑक्सिजन पातळी ९४ पेक्षा कमी असल्यास या सर्व बाबींचा विचार करून उपचार करणारे डॉक्टर कोणती औषधे केव्हा द्यायची याबाबतचा निर्णय घेत असतात. त्यामुळे तज्ज्ञांच्या सल्ल्याने व मार्गदर्शक सूचनांनुसार रेमडेसिविर इंजेक्शनचा वापर योग्य रुग्णांवर करण्यात यावा. या इंजेक्शनचा अनावश्यक वापर टाळणे आवश्यक आहे.
डॉ. कावरखे यांनी सांगितले की, रेमडेसिविर इंजेक्शन हे कोरोनाबाधितांवरील उपचाराचा एक भाग आहे. या इंजेक्शनचा वापर कधी करायचा, याविषयी ‘आयसीएमआर’ने दिशानिर्देश जारी केले असून त्यानुसार कोरोनाबाधितांवर उपचार करणारे डॉक्टर इंजेक्शनच्या वापराविषयी निर्णय घेत असतात. कोणीही या इंजेक्शनच्या अनावश्यक वापराचा आग्रह करणे चुकीचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.