लोकमत न्यूज नेटवर्कशिरपूर जैन : अद्याप मतदार यादीत नाव न नोंदविलेल्या पात्र नागरिकांना मतदार यादीत नाव नोंदविता यावे, यासाठी आधी २३ व २४ फेब्रुवारी २०१९ रोजी सर्व मतदान केंद्रस्तरावर विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्यात आली. मात्र, या मोहिमेत जिल्ह्यातील अनेक मतदान केंद्रांवर ‘बीएलओं’नी दांडी मारल्याने मोहिमेचे विशेष फलीत झाले नाही. त्यामुळे काही ‘बीएलओं’वर कारवाई देखील झाली. दरम्यान, पुन्हा एकवेळ २ व ३ मार्च रोजी ही मोहिम आयोजित करण्यात आली असून त्याची चोख अंमलबजावणी सुरू असल्याचे शनिवार, २ मार्च रोजी दिसून आले.नुकत्याच पार पडलेल्या विशेष पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार म्हणून नोंदणी न झालेल्या वंचित नागरिकांना मतदार नोंदणीची संधी मिळावी म्हणून भारत निवडणूक आयोगाने २ व ३ मार्च रोजी विशेष मतदार नोंदणी मोहीम राबविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार, प्रत्येक मतदान केंद्र स्तरावर या विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले असून मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी नमुना ६ अर्ज, मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी अनिवासी मतदाराने नमुना ६ अ अर्ज, मतदार यादीतील नावास आक्षेप घेण्यासाठी किंवा नाव वगळण्यासाठी नमुना ७ अर्ज, मतदार यादीतील नोंदीच्या तपशिलामध्ये करावयाच्या दुरुस्तीसाठी नमुना ८ अर्ज अथवा मतदार यादीतील नोंदीचे स्थानांतर करण्यासाठी नमुना ८ अ अर्ज सादर करता येतील. सर्व अर्जांचे नमुने संबंधित मतदान केंद्रांवर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. या मोहिमेची चोख अंमलबजावणी व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनही विशेष लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम जिल्ह्यात विशेष मतदार नोंदणी मोहिमेची चोख अंमलबजावणी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2019 3:11 PM