लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम: तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांबाबत १ आॅक्टोबर रोजी महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांचे समवेत महाराष्ट्र राज्य तलाठी, मंडळ अधिकारी समन्वय महासंघाची बैठक झाली. त्यात संवर्गाच्या विविध अडचणींवर चर्चा करण्यात आली. या सभेत प्रामुख्याने कोविड कर्तव्यावर कार्यरत असताना मयत झालेल्या तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्याचे प्रस्ताव महसूल विभागाने मंजूर केले.मुंबई येथील जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल मंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या तलाठी, मंडळ अधिकारी राज्य समन्वय महासंघाच्या सभेस अप्पर मुख्य सचिवांसह कोकण, पुणे व नाशिकचे आयुुक्त प्रत्यक्ष उपस्थित होते . तसेच व्हीसीद्वारे जमाबंदी आयुक्त पुणे, यांच्यासह औरंगाबाद, अमरावती, नागपूरचे आयुक्त सहभागी झाले होते. यावेळी कोविड कर्तव्यावर असताना मयत झालेल्या तलाठी, मंडळ अधिकाºयांच्या वारसांना सानुग्रह सहाय्य देण्याचे प्रस्ताव मंजूर करून वित्त विभागाकडून लेखाशीर्ष व निधी प्राप्त होताच संबंधितास लाभ देण्याचे सांगण्यात आले. त्याशिवाय तलाठी, मंडळ अधिकाºयांची रिक्त पदे भरणे, नवनिर्मित साझे, मंडळांची पदनिर्मिती करणे, तलाठ्यांच्या प्रलंबित आंतर उपविभाग बदल्या, मंडळ अधिकाºयांना कार्यालय भाडे मंजूर करणे, तलाठी कार्यालयाचे प्रलंबित भाडे प्रदान करणे, नैसर्गिक आपत्तीच्या कामासाठी तलाठ्यांना कार्यालयीन खर्चाचा निधी देण्याची तरतूद करणे, मं.अ,, अ. का. अदलाबदली धोरणाचा पुनर्विचार करणे, पीएम किसान योजना राबविताना महसुल विभागास वेठीस धरणे, या विषयांवर सकारात्मक चर्चा झाली. संवर्गाच्या अन्य मागण्यांबाबत अप्पर मुख्य सचिव स्तरावर एक बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. यावेळी तलाठी, मंडळ अधिकारी, समन्वय महासंघाचे राज्याध्यक्ष श्याम जोशी, डुबल आप्पा, बाळकृष्ण गाढवे, लक्ष्मीकांत काजे, गौस महमद लांडगे,अशोक दुधासागरे, संतोष आगिवले, मेजर सावंत , तसेच अन्य पदाधिकारी कार्यकरते उपस्थित होते .
कोविड कर्तव्यावरील मयत तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांच्या वारसांना सानुग्रह अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 02, 2020 4:22 PM