लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने (एसटी) विभागीयस्तरावरून विविध पुरस्कारार्थी आगारपातळीवरील स्वातंत्र्यसैनिक आणि अधिस्विकृतीधारक पत्रकारांना विशेष पास देण्यात येते. आता या पासऐवजी स्मार्टकार्ड देण्यात येणार असून, ही प्रक्रिया व्यवस्थीत पार पाडण्यासाठी ३१ मार्च २०१९ रोजी मुदत संपलेल्या पासेसच्या नुतनीकरणासाठी महिनाभराची मुदतवाढ देण्यात आलेली आहे.एसटी महामंडळाच्यावतीने विभागीयस्तरावरून विविध पुरस्कारार्थी आगारपातळीवरील स्वातंत्र्यसैनिक आणि अधिस्विकृतीधारक पत्रकारांना विशेष पास देण्यात येते. या पासची मुदत वर्षभर असते. आता एसटी महामंडळाने या पासऐवजी स्मार्टकार्ड देण्याची तयारी केली आहे. या प्रक्रियेत संबंधित पासधारकाची नोंदणी करून स्मार्टकार्ड बनविण्यात येणार आहे. या प्रक्रियेला थोडा वेळ लागणार असल्याने पूर्वी वर्षभराची पास दिलेल्या आणि ३१ मार्च २०१९ रोजी मुदत संपलेल्या पासेसच्या नुतनीकरणासाठी महिनाभराची मुदत वाढविण्यात आली आहे. या मुदतीसाठी पूर्वीच्याच पद्धतीने पास देण्यात येणार असली तरी, ही पास देताना विभागीयस्तरावर संबंधित पासधारकाची स्मार्टकार्डसाठी नोंदणी करण्यात येणार आहे. महिनाभरानंतर स्मार्टकार्ड वितरित करताना पूर्वीच्या पासेस जमा करून घेण्यात येणार आहे.
विभागीयस्तरावरील एसटी पास नुतनीकरणासाठी महिनाभराची मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 07, 2019 5:58 PM