वाशिम : कोरोना संसर्ग रोखण्यासाठी जिल्ह्यातील प्रतिबंधात्मक क्षेत्राबाहेरील क्षेत्रात लागू करण्यात आलेल्या जमावबंदी आदेशाला ८ मार्च २०२१ रोजीच्या सकाळी ८ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतचा आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणचे अध्यक्ष शण्मुगराजन एस. यांनी जारी केला.जिल्ह्यातील सर्व दुकाने, आस्थापना सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंतच सुरू राहतील. रोज रात्री ८ ते सकाळी ६ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार आहे. या काळात रुग्णालये, रुग्णवाहिका, औषधी दुकाने, ठोक भाजीपाला विक्री, रेल्वे स्थानक व बसस्थानक तसेच खाजगी बसने उतरणाऱ्या प्रवाशांकरिता आॅटोरिक्षा, महामार्गावरील पेट्रोल पंप, धाबे, एमआयडीसी क्षेत्रातील उद्योग सुरू राहतील. या उद्योगाचे कर्मचारी, कामगार यांना त्यांच्या कार्यालयाच्या ओळखपत्राच्या आधारे जाण्या-येण्याकरिता परवानगी राहणार आहे. प्रत्येक आठवड्यात शनिवारी सायंकाळी ५ ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी राहणार असून या काळात सर्व, दुकाने आस्थापना बंद राहतील. मात्र, या काळात दूध विक्रेते, डेअरी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. जिल्ह्यातील सर्व प्रकारची उपहारगृहे, हॉटेल, रेस्टॉरंट प्रत्यक्ष सुरू न ठेवता केवळ पार्सल सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे.लग्न समारंभासाठी वधू-वरासह केवळ २५ व्यक्तींनाच उपस्थित राहता येईल. त्याकरिता नगरपालिका, नगरपंचायत क्षेत्रात संबंधित नगरपालिका, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी यांची, तसेच ग्रामीण भागाकरिता तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. लग्न समारंभ किंवा इतर छोट्या समारंभ, कार्यक्रमात २५ पेक्षा जास्त व्यक्ती आढळून आल्यास संबंधित मंगल कार्यालय, सभागृह, लॉनचे चालक अथवा मालक, व्यवस्थापक यांना २० हजार किंवा प्रति व्यक्ती ५०० रुपये यापैकी जी जास्त असेल त्या रक्कमेचा दंड आकारला जाईल. जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक प्रशिक्षण केंद्र, खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस बंद राहतील. या आदेशाचे भंग करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध नियमानुसार कारवाई करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाºयांनी दिल्या.
जमावबंदीच्या आदेशाला ८ मार्चपर्यंत मुदतवाढ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 5:34 PM