लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पाच वर्षांचा कालावधी ३० डिसेंबरला संपुष्टात येण्यापूर्वी ग्रामविकास विभागाने प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भातील निर्णय २७ डिसेंबर रोजी रात्री उशिरा जाहिर केला असून, त्या अनुषंगाने वाशिम, अकोला, धुळे, नंदुरबार जिल्हा परिषद व त्या अंतर्गत असलेल्या पंचायत समित्याच यापुढे कार्यरत राहतील, असे स्पष्ट केले आहे.
डिसेंबर २०१३ मध्ये उपरोक्त चारही जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांची सार्वत्रिक निवडणूक झाली होती. पाच वर्षांचा कार्यकाळ ३० डिसेंबर रोजी संपुष्टात येत असल्याचा पृष्ठभूमीवर निवडणुकीचा कार्यक्रमही घोषित झाला होता. परंतू, राखीव जागांची संख्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त झाल्याचा मुद्दा उपस्थित करून जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका दाखल केली होती. विद्यमान न्यायालयाने २७ आॅगस्ट २०१८ रोजी राज्य सरकारला अधिनियमातील तरतुदीत आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी तीन महिन्यांची मुदत देत अकोला, वाशिम, नंदुरबार, धुळे जिल्हा परिषदांची निवडणूक प्रक्रिया यथास्थिती ठेवण्याचा आदेश दिला. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात राखीव जागांच्या तरतुदीच्या कलमात दुरुस्ती करण्याच्या प्रस्तावावर शासनाचा कोणताच निर्णय झाला नाही. जिल्हा परिषद सदस्यांचा कालावधी ३० डिसेंबर २०१८ रोजी तर पंचायत समिती सदस्यांचा कालावधी २८ डिसेंबर २०१८ रोजी पूर्ण होत असल्याने त्यापुढील कालावधीत जिल्हा परिषद व पंचायत समित्यांचे कामकाज सुरळीत चालण्याच्या दृष्टिने चारही जिल्हा परिषदांनी ग्रामविकास विभागाकडे मार्गदर्शन मागविले होते. यावर निर्णय देताना, ग्रामविकास विभागाने स्पष्ट केले की, उपरोक्त चारही जिल्हा परिषद व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या सदस्यांचा विहित कालावधी संपुष्टात येत असल्याने अशा परिस्थितीत सदर चारही जिल्ह्यातील विद्यमान जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या कार्यरत राहतील. या निर्णयामुळे विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ मिळाली असून, मोठा दिलासाही मिळाला. ग्रामविकास विभागाच्या या निर्णयाने जिल्हा परिषदेवर प्रशासक की मुदतवाढ यासंदर्भात असलेली संभ्रमावस्थाही संपुष्टात आणली आहे. मुदतवाढीसंदर्भातील पत्र जिल्हा परिषदांना प्राप्त
वाशिम, अकोला, धुळे व नंदूरबार येथील विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना मुदतवाढ मिळाल्यासंदर्भात ग्रामविकास विभागाने २७ डिसेंबरला जारी केलेले पत्र २८ डिसेंबरला सकाळच्या सुमारास जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाºयांना प्राप्त झाले आहे. विहित पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्यानंतरच्या पुढील काळातही विद्यमान जिल्हा परिषदा व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्या कार्यरत राहतील, यासंदर्भात ग्रामविकास विभागाने जारी केलेले पत्र प्राप्त झाले आहे, असे वाशिम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक कुमार मीना यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.