वाशिम : अकोला-पूर्णा मार्गावरुन धावणारी अमरावती-पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला १ जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. ही रेल्वे वाशिममार्गे धावत असल्याने वाशिमकर प्रवाशांची सोय झाली आहे.
मध्य रेल्वेच्या निर्णयानुसार, गाडी क्रमांक ०१४३९ पुणे-अमरावती विशेष एक्स्प्रेसला २४ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही गाडी शुक्रवारी आणि रविवारी पुणे येथून रात्री १०:५० वाजता सुटून वाशिम येथे दुसऱ्या दिवशी दुपारी १२:५४ मिनिटांनी पोहचेल. १ मिनिटाच्या थांब्यानंतर अमरावतीकडे मार्गस्थ होऊन प्रस्थान स्थानकावर सायंकाळी ५:३० वाजता पोहचेल. तर गाडी क्रमांक ०१४४० अमरावती-पुणे एक्स्प्रेसला २६ नोव्हेंबर ते १ जानेवारी २०२४ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून ही रेल्वे अमरावती येथून दर सोमवार आणि शनिवारी सायंकाळी ७:५० वाजता निघून वाशिम येथे रात्री १०:२९ वाजता पोहचेल. दुसऱ्या दिवशी दुपारी ४:२० वाजता पुणे स्थानकावर पोहचेल.
पुणे-अमरावती-पुणे एक्स्प्रेसला उरुळी, केडगाव, दौंड, जिन्ती रोड, जेऊर, कुर्डवाडी, बार्शी टाऊन, उस्मानाबाद, लातूर, लातूर रोड, परळी वैजनाथ, परभणी, पूर्णा, वसमत, हिंगोली, वाशिम, अकोला, मूर्तीजापूर, बडनेरा येथे थांबा आहे.