वाशिम : डेल्टा प्लस व्हेरिएंटचा संभाव्य धोका लक्षात घेता जिल्ह्याचा समावेश अनलॉकच्या तिसऱ्या स्तरात झाल्याने २८ जून ते १२ जुलै यादरम्यान निर्बंध लागू करण्यात आले. या निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याने यापुढेही सायंकाळी ४ वाजेपर्यंतच दुकाने सुरू राहणार आहेत. शनिवार व रविवारी केवळ अत्यावशक वस्तू व सेवांची दुकाने सुरू राहतील तर इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील.
कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून तिसऱ्या स्तरातील निर्बंध जिल्ह्यात लागू आहेत. १२ जुलैपासून पुढील आदेशापर्यंत निर्बंधांना मुदतवाढ देण्यात आली असून, यापूर्वीच्या नियमावलीत कोणताही बदल नाही. या आदेशानुसार अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू ठेवण्यास मुभा राहील. मात्र, शनिवारी व रविवारी केवळ अत्यावश्यक वस्तू व सेवांची दुकाने सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील व इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील. शनिवारी व रविवारी केवळ पार्सल व होम डिलिव्हरी सुविधा सुरू ठेवण्यास मुभा देण्यात आली आहे. जीम, सलून, ब्यूटी पार्लर, स्पा, वेलनेस सेंटर दररोज सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. याठिकाणी ए.सी.चा वापर करण्यास मनाई राहील. सार्वजनिक ठिकाणे, क्रीडांगणे, मोकळ्या जागा, उद्याने, बगिचे, मॉर्निंग वॉक व सायकलिंगला सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत मुभा राहणार आहे. बाहेर मोकळ्या जागेत सकाळी ५ ते ९ वाजेपर्यंत व सायंकाळी ६ ते रात्री ९ वाजेपर्यंत क्रीडाविषयक बाबींना मुभा राहील. या सर्व प्रक्रियेवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी इन्सिडेंट कमांडर तथा तहसीलदार यांची राहणार आहे.
०००
बॉक्स
५० टक्के कर्मचाऱ्यांची उपस्थिती
खाजगी बँका, विमा, औषधी कंपन्या, सूक्ष्म वित्त संस्था व गैरबँकिग वित्तीय संस्था यांची कार्यालये नियमितपणे सुरू राहू शकतील. कोरोनाविषयक कामे करणाऱ्या आस्थापना, कृषी, बँक, मान्सूनपूर्व कामांशी संबंधित यंत्रणा व आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित यंत्रणा, कार्यालये पूर्ण क्षमतेने सुरू राहतील. दुय्यम निबंधक कार्यालय, एलआयसी, एमएसआरटीसी आदी शासकीय कार्यालये १०० टक्के क्षमतेने सुरू राहतील. उर्वरित सर्व शासकीय कार्यालये ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहतील.
०
बॉक्स
हे बंदच राहणार
सामाजिक व सांकृतिक कार्यक्रम पूर्णत: बंद राहतील. मॉल्स, चित्रपटगृहे, नाट्यगृहे, सर्व खाजगी शिकवणी वर्ग, कोचिंग क्लासेस, संगणक प्रशिक्षण केंद्र व टंकलेखन प्रशिक्षण संस्था पूर्णत: बंद राहतील. सर्व प्रकारची धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद राहतील; परंतु प्रार्थनास्थळांच्या परिसरामध्ये राहणारे पुजारी व वहिवाटदार यांना पूजा-अर्चना करता येईल. मात्र, इतर नागरिकांना प्रवेश राहणार नाही. ज्या धार्मिक व प्रार्थनास्थळी विवाह व इतर विधी करण्यात येत असतील, तेथे कोविड-१९ नियमांचे पालन करण्यात यावे.
००
या सेवा सुरू राहणार
अत्यावश्यक वस्तू व सेवांसह इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार दरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत सुरू राहतील. शनिवार व रविवारी केवळ अत्यावशक वस्तू व सेवांची दुकाने सुरू राहतील तर इतर सर्व दुकाने पूर्णत: बंद राहतील. हॉटेल, रेस्टॉरंट, खाणावळी, शिवभोजन थाळी केंद्र सोमवार ते शुक्रवारदरम्यान सायंकाळी ४ वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. सार्वजनिक बस वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू राहील. विवाह समारंभामध्ये ५० लोकांच्या उपस्थितीस व अंत्यविधीस २० लोकांच्या उपस्थितीस मुभा राहील.
०००
कोट बॉक्स
जिल्ह्यात तिसऱ्या स्तरातील निर्बंधांना पुढील आदेशापर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे. निर्बंधांचे पालन करून जिल्हावासीयांनी प्रशासनाला सहकार्य करावे.
- शैलेश हिंगे
निवासी उपजिल्हाधिकारी, वाशिम