वाशिम: ६ जानेवारी २०१७ च्या शासन निर्णयानुसार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सन २०१६-१७ या शैक्षणिक वर्षापासून अनुसूचित जाती व नवबौध्द विद्यार्थ्यांसाठी सुरु करण्यात आली. याअंतर्गत १५ नोव्हेंबरपर्यंत अर्ज सादर करणे बंधनकारक होते. मात्र, विहित मुदतीत योजनेस फारसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता मुदत वाढवून ३१ डिसेंबर करण्यात आल्याची माहिती समाज कल्याण विभागाने कळविली आहे.
योजनेचा लाभ घेऊ इच्छित विद्यार्थ्यास किमान ५० टक्के गुण असणे अनिवार्य आहे. याशिवाय सामाजिक न्याय विभागाच्या शासकीय वसतीगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी विचार करण्यात येणार आहे. जिल्हयाच्या ठिकाणी असलेल्या महाविद्यालयात शिकत असलेले विद्यार्थी सदर योजनेचा लाभ मिळण्यास पात्र असतील. त्यानुसार पात्र विद्यार्थींनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, वाशिम या कार्यालयात विहित नमुण्यात अर्ज सादर करावे, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण यांनी केले आहे.