मंगरुळपीर (वाशीम) : एक लाख रुपयांची मागणी करून रक्कम न दिल्यास वरिष्ठांना सांगून निलंबित करण्याची धमकी दिल्याप्रकरणी मंगरूळपीर पोलिसांनी एका पत्रकारासह मानद वन्यजीव रक्षकावर गुरूवारी (दि.१) गुन्हा दाखल केला. पत्रकार संतोष उर्फ बाळू काळे व मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे अशी आरोपींची नावे आहेत.
फिर्यादी मंगरुळपीरचे वनक्षेत्र सहाय्यक श्याम नवलकार यांनी तक्रार दिली की, आरोपी पत्रकार बाळू काळे व मानद वन्यजीवरक्षक गौरवकुमार इंगळे यांनी संगनमत करुन नवलकार यांना आर्थीक मागणी केली. रक्कम न दिल्यास वरिष्ठांना सांगून निलंबीत करण्याच्या धमक्या दिल्या. शासनाने नियुक्त केलेला मानद वन्यजीवरक्षक हा पत्रकाराशी संगमत करुन पैश्याची मागणी करीत आहे. या दोघांवर खंडणी मागणे, भ्रमणध्वनी क्रमांकावर धमकीचे संदेश टाकुन बेकायदेशीर पैश्याची मागणी करणे, ब्लॅकमेल करणे व वृतपत्रात बदनामी करुन फसवणुक केल्याने इंगळे व काळे यांचे विरुध्द फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत नमूद आहे. यावरून मंगरूळपीर पोलिसांनी दोन्ही आरोपीवर भादंवी कलम ३८४, ३८५, ५०१, ३४ नुसार गुन्हा दाखल केला. पुढील तपास एपीआय तुषार जाधव करीत आहेत.