वाशिम - शैक्षणिक सत्र २०१६-१७ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या; परंतू शाळांनी रूजू करून न घेतलेल्या अनेक शिक्षकांना तीन महिन्यांपासून वेतन मिळाले नाही. सदर शिक्षकांचे नियमानुसार वेतन काढण्यात यावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने १९ जानेवारी रोजी माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली.
शैक्षणिक सत्र २०१६-१७ मधील संचमान्यतेनुसार वाशिम जिल्ह्यातील ३७ शिक्षक अतिरिक्त झाले आहेत. त्यानुसार जिल्हास्तरावर १७ शिक्षकांचे आॅनलाईन पद्धतीने समायोजन करण्यात आले तर १४ शिक्षकांचे विभाग स्तरावरून समायोजन करण्यात आले. उर्वरीत शिक्षकांचे राज्यस्तरावरून समायोजन होईल.
समायोजन करण्यात आलेल्या शिक्षकांपैकी काहींना संबंधित संस्था, मुख्याध्यापकांनी रूजू करून घेतलेले नाही, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. महाराष्ट्र खासगी शाळांतील कर्मचारी (सेवेच्या शर्ती) नियमावली १९८१ नुसार अतिरिक्त शिक्षक समायोजित होईपर्यंत त्यांचे मूळ वेतन आस्थापनेतून काढण्यात यावे, अशी तरतूद आहे. तरीदेखील अद्याप संबंधित शिक्षकांचे वेतन काढण्यात आले नाही. मागील तीन महिन्यांपासून वेतन नसल्याने संबंधित शिक्षक व कुटुंबियांसमोर आर्थिक पेच निर्माण होत आहे. ही अत्यंत गंभीर बाब असून, संबंधित शिक्षकांना वेतन देण्यात यावे, अशी मागणी विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाने शिक्षणाधिकारी डॉ. देवीदास नागरे यांच्याकडे केली. निवेदनावर विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे प्रांतीय सदस्य जे.एस. शिंदे, जिल्हाध्यक्ष राजेश नंदकुले, कार्याध्यक्ष राजेश खाडे, बाळासाहेब गोटे, जिल्हा सचिव गोविंद चतरकर आदींच्या स्वाक्षरी आहेत.