वाशिम : अतिवृष्टी झाली तर नदीकाठावरील २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गावात जाण्यासाठी नदीनाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने नागरिकांना पाण्यातून मार्गक्रमण करीत गाव गाठावे लागते.
गत तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. मंगरूळपीर तालुक्यातील भोपळपेंड नदीला पूर आल्यानंतर जवळपास १४ गावांचा संपर्कही तुटला होता. राज्यात कोकणासह कोल्हापूर आदी शहरांमध्येही पावसाने कहर केला. जिल्ह्यात अतिवृष्टी झाली तर २० पेक्षा अधिक गावांना पुराचा तडाखा बसू शकतो. काही गाव परिसरातील नदी, नाल्यावर पूल नसल्याने गावकऱ्यांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना, चिंचोली, पिंपळगाव आदी गावातील नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागते. पुलाची निर्मिती करण्यात यावी, अशी मागणी पांगरी नवघरे, खडकी सदार, जायखेडा, नेतन्सा आदी भागातील नागरिकांनी वारंवार केली. परंतु, याकडे संबंधित यंत्रणेने अद्याप लक्ष दिले नाही. त्यामुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, अतिवृष्टी, संततधार पाऊस झाला तर बचाव म्हणून जिल्हा प्रशासनाने जिल्हास्तर व तालुकास्तरावर नियंत्रण कक्ष स्थापन केले. शोध व बचाव पथके सज्ज ठेवणे, पंचनामा पथके तयार ठेवणे, पोहणाऱ्या व्यक्तींची माहिती संकलित करणे, तात्पुरते निवारे निश्चित करणे, स्वयंसेवी संस्थेचा सहभाग घेणे याबाबत जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना निर्देश दिले आहेत.
००००००००
जिल्ह्यात पाणी साचणारी ठिकाणं
संततधार पाऊस झाला तर मालेगाव तालुक्यातील पांगरी नवघरे, रिसोड तालुक्यातील खडकी सदार, मानोरा तालुक्यातील चाकूर-गव्हा, मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव, शेंदुरजना आदी गाव परिसरात पाणी साचते. नदी, नाल्यावर जमीन समांतर पूल असल्याने पूर जातो. त्यामुळे गावात प्रवेश करताना पांगरी नवघरे, खडकी सदार आदी गावातील नागरिकांना पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते.
००००
पुलाची निर्मिती केल्यास गैरसोय टळेल
नदी, नाल्यावर उंच पुलाची निर्मिती झाल्यास पूर जरी आला तरी नागरिकांना पुलावरून जाणे सोयीचे ठरणारे आहे. त्यामुळे खडकी सदार, चाकूर- गव्हा, पांगरी नवघरे यासह अन्य गाव परिसरातील नदी, नाल्यावर पुलाची निर्मिती करावी, अशी मागणी होत आहे.
००००
पाऊस नको नकोसा !
कोट
संततधार पाऊस आला की गावाजवळून जाणाऱ्या नदी-नाल्याला पूर जातो. पूल नसल्यामुळे गावाचा संपर्क तुटतो. पूर ओसरल्यानंतर पाण्यातूनच मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी पुलाची उभारणी करणे आवश्यक आहे.
- गणेश पाटील सदार
खडकी सदार
००००
कोट
अतिवृष्टीमुळे गावाला पुराचा वेढा पडतो. गावात पावसाचे पाणी शिरत असल्याने भीतीचे वातावरण असते. त्यामुळे अतिवृष्टी, संततधार पाऊस नको, नकोसा वाटतो. प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे अपेक्षित आहे.
- मधुकर सोळंके
चिंचोली
०००००००००००००
प्रशासनाचे तेच ते रडगाणे
जिल्ह्यातील पांगरी नवघरे, खडकी सदार, चिंचोली यासह अन्य गावकऱ्यांना पाण्यातून मार्गक्रमण करावे लागते. या ठिकाणी उंच पुलाची निर्मिती अद्याप झाली नाही. निधी नाही, प्रशासकीय सोपस्कार बाकी आदी कारणे सांगून गावकऱ्यांची बोळवण केली जात आहे.
००००००००