लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत वाशिम जिल्ह्यासाठी केरोसीनच्या पुरवठ्यात प्रचंड प्रमाणात कपात झाली असून, गत महिन्यात तीन लाख लिटर असलेला केरोसीनचा पुरवठा चालू महिन्यात केवळ ३५ हजार लिटरवर आला आहे.केंद्र शासनाकडून राज्य शासनाला केरोसीनचा पुरवठा करताना पात्र शिधापत्रिकारांची संख्या, शिधापत्रिकांवरील सदस्य संख्या आणि गॅसधारक संख्या यासह अन्य बाबी विचारात घेतल्या जातात. शिधापत्रिकेवर एक किंवा दोन सिलेंडरची नोंद असल्यास त्या कुटुंबाला केरोसीन दिले जात नाही. पात्र शिधापत्रिकाधारकांनी हमीपत्र सादर केले तरच केरोसीनचा पुरवठा होत आहे. ग्रामीण भागातील शिधापत्रिकाधारकांपर्यंत अद्याप या सुधारीत निकषाची माहितीच पोहचली नसल्याने आणि माहिती पोहचविण्याचे प्रयत्नही प्रशासनाकडून झाले नसल्याने आॅक्टोबर महिन्यातील केरोसीनच्या पुरवठ्यात प्रचंड घट आली आहे. सप्टेंबर २०१८ या महिन्यात वाशिम जिल्ह्यात तीन लाख लिटर केरोसीनचा पुरवठा झाला होता. आॅक्टोबर महिन्यात १७ तारखेला केवळ ३६ हजार लिटर केरोसीनचा पुरवठा झाला असून, हा पुरवठाही समप्रमाणात सहा तालुक्यात प्रत्येकी सहा हजार याप्रमाणात केला जाणार आहे. जर केरोसीनचा पुरवठा लाभार्थींचे हमीपत्र आणि शिधापत्रिकाधारकांची संख्या या निकषावर आधारीत असेल तर सहा तालुक्यात समप्रमाणात केरोसीनचा पुरवठा नेमका कोणत्या निकषावर होत आहे? असाही प्रश्न उपस्थित होत आहे. दिवाळीचा सण १५ दिवसांवर येऊन ठेपलेला असताना, नेमके दिवाळी सणादरम्यानच केरोसीन मिळणार नसल्याने गोरगरीबांची दिवाळी अंधारात जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.दरमहिन्यात प्रत्येक तालुक्यात ५० ते ६० हजार लिटर होणारा पुरवठा आता सहा हजारावर आल्याने केरोसीनचे वाटप नेमके कुणाला करावे? या गोंधळाने केरोसीन विक्रेतेही भांबावून गेले आहेत.
शिधापत्रिकेवरील गॅस सिलेंडरची नोंद आणि लाभार्थींचे हमीपत्र यानुसार आॅक्टोबर महिन्यात जिल्ह्याला केरोसीनचा पुरवठा ३६ हजार लिटर झाला आहे. लाभार्थींच्या हमीपत्रानुसार यामध्ये पुढील महिन्यात वाढही होऊ शकते.- देवराव वानखेडे,जिल्हा पुरवठा अधिकारी, वाशिम