सुनील काकडे वाशिम, दि. 0९: कधीकाळी कोरडवाहू जमिनीवर पारंपरिक पिके घेताना पाण्याच्या थेंबासाठी तरसणार्या वाळकी-दोडकी या गावांमध्ये लोकसहभागातून झालेल्या जलसंधारणाच्या कामांमुळे आजरोजी जिकडे-तिकडे खळखळून वाहणार्या पाण्याचे पाट दिसून येतात. यामुळे तब्बल ८५0 एकर जमीन सिंचनाखाली आली असून दोन्ही गावांचा कायापालट झाला आहे. दरवर्षीच पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य निर्माण होत असल्याने वाळकी-दोडकी या गावांना टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असे. खरिप हंगामादरम्यान शेतातील विहिरी कोरड्याठाण्ण पडायच्या. जवळपास कुठलेच मोठे धरण, तलाव नसल्याने कोरडवाहू जमिनीतून पावसाच्या पाण्यावर विसंबून राहत, मिळेल तेवढे उत्पादन घ्यावे लागत असे. रबी हंगामात तर सिंचनाचा मोठा प्रश्न गावातील शेतकर्यांना भेडसावयाचा. या विपरित परिस्थितीवर मात करून वाळकी-दोडकी या गावांमध्ये जलसंधारणाची शाश्वत सोय निर्माण व्हावी आणि शेतकर्यांना जाणवणारा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघावा, यासाठी दोडकी येथील सामाजीक कार्यकर्ते सुभाषराव नानवटे यांनी भगिरथ प्रयत्न करून जलसंधारणाचे महत्व गावकर्यांना पटवून दिले. त्यांच्या हाकेला ह्यओह्ण देत गावकर्यांनी देखील या कार्यात स्वत:ला झोकून देत ठिकठिकाणी पावसाचे पाणी अडविण्यासाठी सर्वंकष प्रयत्न केले. सुभाषराव नानवटे यांनी कृषी विभाग, कृषी समृद्धी योजना, भुजल सर्वेक्षण यंत्रणा, रतन टाटा ट्रस्ट स्वयंशिक्षण प्रयोग, जिल्हा परिषद, स्थानिक स्तर यासह इतर यंत्रणांकडून जलसंधारणाच्या कामांकरिता भरीव निधी मिळविला. त्यास लोकसहभागाची जोड मिळाल्याने वाळकी-दोडकी या गावांमध्ये आजमितीस ठिकठिकाणी पाणी अडविणे शक्य झाले आहे. यामुळे शेतांमधील पिकांसाठी लागणारे पाणी उपलब्ध होण्यासोबतच गावात यापुढे कधीच कोरडा दुष्काळ उद्भवणार नाही, याची तजवीज करून ठेवण्यात गावकर्यांना यश प्राप्त झाले आहे. आगामी रबी हंगामात या पाण्याचा प्रत्यक्ष फायदा होणार आहे.
लोकसहभागातून जलसंधारणाची सोय!
By admin | Published: August 10, 2016 1:23 AM