सोशल मीडियावर चुकीचा हेतू मनात बाळगून बनावट अकाऊंट तयार करणाऱ्यांचे आणि यामाध्यमातून अनेकांची फसवणूक करणाऱ्यांचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढीस लागले आहे. यामुळे अभिनेता, खेळाडू, राजकारणी यांच्यासह सर्वसामान्य लोकांनाही नाहक मन:स्ताप सहन करावा लागतो. अशा बनावट अकाऊंटवर लगाम लावण्यासाठी आता शासनानेच ठोस पाऊल उचलले आहे. ट्विटर, फेसबुक, इन्स्टाग्राम आणि यूट्यूबसारख्या सोशल मीडियावरील कोणत्याही खात्यात फेक फोटो असल्याची तक्रार कोणत्याही व्यक्तीकडून किंवा त्याच्याशी संबंधित इतर कोणाकडूनही होत असेल, तर कंपनीला तो फोटो २४ तासांच्या आत हटवावा लागेल, हे अनिवार्य करण्यात आले आहे. नव्या आयटी नियमांत यासंबंधीची तरतूद करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.
......................
सायबर सेलकडे चार तक्रारी दाखल
फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार केल्याच्या चार तक्रारी चालु वर्षात सायबर सेलकडे दाखल झाल्या आहेत. चाैकशी केली असता कुठल्याही प्रोफेशनल हॅकर्सकडून हा प्रकार झाला नसल्याचे निदर्शनास आले, अशी माहिती सायबर सेलचे अजयकुमार वाढवे यांनी दिली.
...................
कोरोनाकाळामध्ये वाढल्या तक्रारी
जिल्ह्यात २०१९ व २०२० या वर्षांत सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार केल्याची एकही तक्रार नाही.
कोरोनाकाळात मात्र यासंदर्भातील तक्रारी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. गत महिन्यात ग्रामीण पोलीस स्टेशनमध्येही अशीच एक तक्रार दाखल झालेली आहे.
....................
४८ तास ते ७ दिवसांत खाते बंद
बनावट अकाऊंट तयार केले किंवा फेक फोटो अपलोड केल्यासंबंधीची तक्रार झाल्यानंतर सायबर सेलकडून त्याची दखल घेतली जाते.
संबंधित सोशल मीडिया कंपनीला याबाबत अवगत करण्यात आल्यानंतर ४८ तास ते पुढील ७ दिवसांत सोशल मीडियावरील संबंधित खाते बंद केले जाते.
................
पोलिसांसाठी वेगळे पोर्टल
सोशल मीडियावर बनावट अकाऊंट तयार करणे, फेक फोटो अपलोड करण्यासंबंधीच्या तक्रारींचे प्रमाण अलीकडच्या काळात वाढलेले आहे.
त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी शासन व सायबर सेलचे युद्धस्तरावर प्रयत्न सुरू आहेत.
त्यानुषंगाने पोलीस कर्मचाऱ्यांकरिता वेगळे पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. या माध्यमातून सोशल मीडियाद्वारे होणाऱ्या चुकीच्या प्रकारांवर नियंत्रण मिळविणे सुरू आहे.
.................
तुम्हाला बनावट अकाऊंट दिसले तर...
सोशल मीडियावर विशेषत: फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून त्याद्वारे सर्वसामान्य लोकांना गंडविण्याचा गोरखधंदा सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातही अलीकडच्या काळात अशा चार ते पाच घटना उघडकीस आल्या आहेत.
तथापि, बनावट अकाऊंट तयार केल्याचे लक्षात आल्यानंतर विशेषत: मित्रांकडे पैशाची मागणी केली जाते. त्यास कुठलाही प्रतिसाद देऊ नये.
फेक अकाऊंटचा प्रकार लक्षात आल्यानंतर तत्काळ संगणकावर जाऊन संबंधित खात्यासंबंधी ‘यूआरएल’ घेऊन ठेवावा, अनोळखी लोकांची फ्रेन्ड रिक्वेस्ट स्वीकारू नये किंवा त्यांच्याकडून होणाऱ्या कुठल्याही प्रकारची मागणी पूर्ण करू नये, असे आवाहन सायबर सेलकडून करण्यात आले आहे.