संतोष वानखडे, वाशिम: मालेगाव तालुक्यातील बोराळा येथील अनुसूचित जातीची सर्वच ४२ कुटुंबे गावातील जुने राजकीय वैमनस्य आणि गावातील काही व्यक्तींकडून वारंवार मिळणाऱ्या धमक्यांमुळे १५ डिसेंबर रोजी गाव सोडून गावापासून एक किमी अंतरावर सर्व मुलाबाळांसह ई-क्लास जमिनीवर राहायला गेले होते. राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी यांनी १९ डिसेंबर रोजी या कुटुंबियांची भेट घेतली. या कुटुंबियांना सुरक्षेची ग्वाही देऊन थंडीच्या दिवसात उघड्यावर मुलाबाळासह आता न राहता सर्वांनी गावात जाऊन मुलाबाळांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबावावे, अशी विनंती केली आणि त्या सर्व कुटुंबांना सोबत गावात घेऊन आले.
सुभाष पारधी यांनी या कुटुंबियांशी संवाद साधून त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. आरोपीविरुद्ध चार्जशीट दाखल झाली आहे. कोर्ट न्याय करेल. आपल्याविरुद्ध पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या खोट्या तक्रारीची शहानिशा करण्यात येईल. मुलाबाळांचे भविष्य बघून आपण गावात जावे. पोलीस विभाग याबाबत दक्षता घेईल, आपल्यावर अन्याय होणार नाही याकडे अनुसूचित जाती आयोग लक्ष देणार असल्याचे सुभाष पारधी यांनी सांगितले, तसेच राहत असलेल्या जागेच्या आठ-अ, सर्व सरकारी दस्ताऐवजही ग्रामपंचायतमध्ये जमा करून घेण्याच्या सूचना त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिल्या. पाच वर्षात त्या कुटुंबांनी जो गावाच्या विकास कामात गैरव्यवहार केला आहे, त्याची चौकशी करण्याचे निर्देशित त्यांनी यावेळी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिले.