तालुका कृषी अधिकारी कार्यालय वाशिममार्फत राबविण्यात येत असलेल्या क्रॉपसॅपअंतर्गत दगड उमरा येथे २४ जुलै रोजी शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या शेतीशाळेत मार्गदर्शन करताना कृषी सहायक एस.बी. वानखडे यांनी सोयाबीनवर येणाऱ्या कीड व रोगांविषयी माहिती दिली, तसेच किडींची ओळख करून दिली. किडींचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या खाली असल्यास प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी, तसेच किडींचे प्रमाण आर्थिक नुकसान पातळीच्या जवळ किंवा वर असल्यास कृषी विद्यापीठाच्या शिफारसीप्रमाणे लेबल क्लेम कीटकनाशकांची फवारणी करण्याचा सल्ला त्यांनी दिला. या शेतीशाळेत प्रामुख्याने उपसरपंच जनार्दन किसन पाठे, संजय प्रकाश पाठे, कैलास वाणी, सुखदेव नारायण पाठे, नथुजी पाठे, आभिमन पाठे, प्रल्हाद पाठे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
-----
फवारणीदरम्यान काळजी घेण्याचे आवाहन
फवारणी करताना सुरक्षा किट वापरण्यासह वाऱ्याचा वेग जास्त असल्यास फवारणी शक्यतो टाळावी, तसेच वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने फवारणी करू नये. शक्यतो, सकाळच्या वेळेला किंवा संध्याकाळी चार ते सहा या दरम्यान फवारणी करावी. कृषी केंद्रातून औषध खरेदी करते वेळेस पक्के बिल घ्यावे, असे आवाहन एस.बी. वानखडे यांनी शेतकऱ्यांना केले.