लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : यंदाच्या खरीप हंगामात शेतकर्यांनी महाबीजकडून घेतलेले सोयाबीन बियाणे अनेक ठिकाणी उगवलेच नाही. यासंदर्भातील अहवालाची पाहणी करून तब्बल अडीच महिन्यांनंतर महाबीजने नुकसानग्रस्त शेतकर्यांना बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार नुकसानग्रस्त शेतकर्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी त्यांचे खाते क्रमांक आणि नावे संकलित करण्याचे काम कृषी विभागाकडून करण्यात येत आहे. यासंदर्भात लोकमतने २१ जुलै रोजी त्या बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून महाबीजचे लक्ष वेधले होते. यंदाच्या खरीप हंगामात महाबीजकडून घेतलेले अनेक शेतकर्यांचे सोयाबीन बियाणे उगवलेच नाही. मानोरा तालुक्यातील ९0, वाशिममधील ३२, रिसोडमधील ८ आणि मालेगावातील ७ अशा १३७ शेतकर्यांनी यासंदर्भात कृषी विभागाकडे तक्रार केली होती. या प्रकाराची जिल्हा परिषदेच्या २८ जून रोजी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत वादळी चर्चा झाली होती. या सभेत जिल्हा परिषद सदस्य सचिन पाटील रोकडे यांनी महाबीज बियाण्याची रिकामी बॅग परिधान करून सभागृहाचे लक्ष वेधून घेत मानोरा तालुक्यातील न उगविलेल्या महाबीजच्या बियाण्याचा मुद्दा उपस्थित केला. या मुद्याला अन्य जिल्हा परिषद सदस्य व उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनीही दुजोरा दिला होता, तर सभेच्या पीठासीन अधिकारी जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा दिलीप देशमुख यांनी याप्रकरणी चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या कृषी विकास अधिकार्यांना दिले होते. त्यानंतर तालुका कृषी तालुका कृषी अधिकारी, पंचायत समितीचे कृषी अधिकारी आणि कृषी शास्त्रज्ञांचा समावेश असलेल्या समितीकडून या नुकसानीची पाहणी करण्यात आली आणि त्या संदर्भातील अहवाल परीक्षणासाठी महाबीजकडे जुलै महिन्याच्या सुरुवातीला पाठविण्यात आला; परंतु तीन आठवडे उलटल्यानंतरही याची दखल घेण्यात आली नसल्याने ‘लोकमत’च्यावतीने २१ जुलै रोजी त्या बियाण्यांबाबत महाबीजच्या निर्णयाची प्रतीक्षा’ या मथळय़ाखाली वृत्त प्रकाशित करून महाबीजचे लक्ष वेधले होते. आता या प्रकरणाची संपूर्ण तपासणी करून शेतकर्यांना न उगवलेल्या बियाण्यांचा मोबदला देण्याचा निर्णय महाबीजने घेतला आहे. त्यानुसार ज्या शेतकर्याने जेवढे बियाणे घेतले असेल, तेवढय़ा बियाण्याची रक्कम संबंधित शेतकर्याला मिळणार आहे. यासाठी कृषी विभागाकडून शेतकर्यांचे नाव आणि खाते क्रमांक घेण्यात येत आहेत.
यंदाच्या खरीप हंगामात महाबीजच्या न उगवलेल्या बियाण्यांची रक्कम भरपाई म्हणून देण्यास महाबीजने मान्यता दिली आहे. ही रक्कम शेतकर्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार असल्याने त्यांचे खाते क्रमांक आणि नाव प्राप्त करून घेण्यात येत आहेत. -नरेंद्र बारापत्रेकृषी विकास अधिकारी,-