ऑनलाइन लोकमत / संतोष वानखडे
वाशिम, of. 23 - शेतक-यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने बचत गटाच्या माध्यमातून शेतक-यांना उत्पादक कंपनीचे मालक होण्याची हाक दिली आहे. या हाकेला प्रतिसाद देत वाशिम जिल्ह्यातील शेकडो शेतकरी बचत गटाने २४ उत्पादक कंपनीचे मालक होण्याचा मान मिळविला आहे.
कृषी विभागाच्या सहकार्यातून शेतकरी बचत गटातील सभासदांना विविध योजनांचा लाभ देऊन आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. २८ ते ३० बचत गटातील जवळपास ५०० ते ५५० शेतकरी एकत्र आले तर शेतकरी उत्पादक कंपनीचे प्रशासकीय सोपस्कार केले जातात. बिज प्रक्रिया, भाजीपाला प्रक्रिया व विक्री केंद्र, दुग्धोत्पादन, दालमिल, कुकुटपालन यासारख्या शेतीशी निगडीत बाबी लक्षात उत्पादक कंपनीची स्थापना कृषी विभागामार्फत केली जाते. रिसोड तालुक्यात बाळखेड व किनखेडा येथील शेतकरी बचत गटांनी बिजोत्पादनात पाऊल टाकले आहे. किनखेडा येथील संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक समूहातर्फे सोयाबीन, उडीद, मूग, तूर आदी बियाण्यांचे उत्पादन करण्याच्या कार्याला सुरूवात करण्यात आली. किनखेडा परिसरातील २८ ते ३२ शेतकरी बचत गट एकत्र येऊन संत ज्ञानेश्वर शेतकरी उत्पादक समूह शासनाच्या कृषी विभागामार्फत (आत्मा कार्यालय) स्थापन केला. पहिला प्रयत्न म्हणून सोयाबीन डीएसबी २१ व ९३०५ ब्रीडर बियाणे २२५ एकरावर तसेच ९३०५ फाऊंडेशन बियाणे कार्यक्रम ३२५ एकरावर घेतला. या कार्यक्रमांतर्गत शेतकºयांना प्लॉटसाठी दिलेले सोयाबीन बियाणे आता खरेदी स्वरुपात या गटाच्या समूहातर्फे घेतले जात आहे. बचत गटाच्या माध्यमातून शेतकरीच उत्पादक कंपनीचे मालक होत असल्याची बाब इतरांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.