मालेगाव पाटबंधारे उपविभागांतर्गत सोनल प्रकल्पातून शेलूबाजार परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी कालव्याद्वारे पाणी सोडले जाते. या पाण्याच्या आधारे शेलूबाजारसह परिसरातील गावचे शेतकरी शेकडो हेक्टर क्षेत्रात सिंचन करून विविध पिके घेत आहेत. शेतकऱ्यांसाठी कालव्याद्वारे सोडण्यात येत असलेल्या पाण्याचा प्रवाह वाढल्यानंतर अनेक शेतकरी कालव्याचे मायनर बंद करीत नाहीत. त्यामुळे हे पाणी कालव्यातून बाहेर निघते आणि शेंदुरजना-शेलूबाजारदरम्यान वाहणाऱ्या खारीनाल्यात येते. त्यामुळे खारी नाला म्हणून ओळखला जाणारा हा नाला, तुडुंब भरून वाहतो. प्रत्यक्षात या पाण्याचा अपव्यय होत असल्याने सुखदेव हरणे यांनी या नाल्यावर स्वखर्चाने बंधारा बांधला. त्यामुळे या नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी थांबून राहत असल्याने नाल्याच्या काठी शेती असलेले शेतकरी या पाण्याचा सिंचनासाठी उपयोग करून विविध पिके घेत आहेत.
-------
कोट : सोनल प्रकल्पाव्या कालव्यात सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. हे पाणी खारी नाल्यात वाहून येते. त्यामुळे नाल्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढते. हे पाणी अडविल्यास आम्हाला सिंचन करणे शक्य होईल, म्हणून मी स्वखर्चाने या नाल्यात बंधारा बांधला. आता नाल्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने आम्ही उपसा पद्धतीने सिंचन करीत आहोत.
- सुखदेव हरणे, शेतकरी शेलूबाजार