रिसोड (वाशिम) - तालुक्यातील वाकद येथील ४० वर्षीय शेतकरी गजानन देवबा अंभोरे यांनी नापिकी व कर्जाला कंटाळून राहत्या घरातध्ये गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारीच्या रात्रीदरम्यान उघडकीस आली.
गजानन अंभोरे यांच्या नावावर दोन एकर शेती होती तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ५० हजार रुपयांचे कर्ज होते. २०१७ मध्ये शेतीतून अपेक्षीत उत्पन्न झाले नाही. लागवड खर्चही वसूल झाला नाही. त्यामुळे कर्जाची परतफेड कशी करावी? या चिंतेने त्यांना ग्रासले होते. सततची नापीक, कर्जबाजारीपणा व मुलीचे लग्न यामुळे गजानन अंभोरे हे नेहमीच चिंतेत राहत होते. याला कंटाळून राहत्या घरामधील मागच्या बाजुला असलेल्या खोलीमध्ये गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली. गजानन हा वडीलाला एकुलता एक मुलगा होता. मुतक गजानन यांच्या मागे पत्नी, एक मुलगा व दोन मुली असा परिवार आहे. मुली लग्नाला आल्या आहेत.
आत्महत्येप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मुत्युची नोंद केली आहे. पुढील तपास ठाणेदार राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी जनार्दन गिºहे करीत आहेत.