लोकमत न्यूज नेटवर्ककामरगाव : कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील पवार दाम्पत्याने अनेक संकटांवर मात करीत रेशीम लागवड केली. रेशीम निर्मितीसाठी पतीपत्नी खांद्याला खांदा लावून मेहनत घेत असून अनेक शेतकरी त्यांच्या या रेशीम शेती लागवडची पाहणी करुन समाधान व्यक्त करीत आहेत.कारंजा तालुक्यातील कामरगाव येथील प्रगतशिल शेतकरी संदीप गुलाबराव पवार यांनी आपल्या कामरगाव शिवारातील २ एकर क्षेत्रावर जिल्हा रेशीम कार्यालयाच्या मार्गदर्शनात रेशिम शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार त्यांनी २ एकर क्षेत्रावर तुतीची लागवड केली. अल्पावधीतच मेहनतीमुळे तुती बहरली. त्यानंतर त्यांनी रेशिम शेड उभारून त्यामध्ये २५० ची पहिली बॅच टाकली, परंतु एकेदिवशी अज्ञात इसमाने पवार यांच्या रेशिम शेडला आग लावली. त्यात त्यांनी टाकलेली २५० ची बॅच जळून खाक झाली. यात संबंधित शेतकºयाचे अंदाजे १ लाख रूपयांचे नुकसान झाले. कामरगाव येथील तलाठी भगत, ग्रामसेवक गोपाल मिसाळ व कृषी सहायक राऊुत यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. तसेच जिल्हा रेशिम अधिकारी मोरे व सहायक अधिकारी भईरम यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने त्यांनी जिल्हा रेशीम कार्यालयाकडे नुकसान भरपाईची मागणी केली होती. परंतू सदर कार्यालयाने या मागणीकडे पाठ फिरवित कोणतीही मदत केली नाही. तरीही घडलेल्या घटनेमुळे हताश न होता व खचून न जाता नव्याने रेशिम शेती करण्याचा सल्ला संदीप पवार यांच्या अर्धांगिनी कांचन पवार यांनी दिला. संकटात पत्नीची मिळालेली साथ पाहून संदीप पवार यांनी पुन्हा जिद्दीने रेशीम शेती करण्याचा निर्णय घेतला. आज घडीला त्यांच्या शेतात २ एकर क्षेत्रावर हिरवीगार तुती बहरली असून त्यांनी पुन्हा २५० ची बॅच टाकून त्यापासून उत्पादन घेतले आहे. सदर बॅचमधून त्यांना २ ते अडीच क्विंटल उत्पादन मिळाले असून बाजार भावानुसार त्याची किंमत ६० हजार रूपयाच्या जवळपास आहे.
कामरगाव येथील दाम्पत्याने संकटांवर मात करीत केली रेशिम लागवड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2019 3:13 PM