संतोष वानखडे /वाशिम : तऱ्हाळा (ता. मंगरूळपीर) येथील शेताशिवारात जमा करुन ठेवलेल्या हरभरा गंजीच्या रखवालीसाठी गेलेल्या २८ वर्षीय गणेश प्रकाश बाईस्कर या युवकावर रानडुक्करांनी हल्ला केल्याने यामध्ये त्याचा मृत्यू झाल्याची घटना १ मार्च रोजी पहाटे ५ वाजताचे दरम्यान घडली.
तऱ्हाळा येथील गणेश प्रकाश बाईस्कार हा शेतात हरभऱ्याच्या गंजीच्या रखवालीसाठी गेला होता. बुधवारी पहाटे ५ वाजताचे दरम्यान रानडुकराने त्याच्यावर हल्ला केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेशने मदतीची याचना केल्यानंतर बाजूच्या शेतातून त्याचा भाऊ धावत आला. परंतु त्याला मदत करण्यापुर्वीच त्याची प्राणज्योत मालवली. गणेशला यावर्षी लग्न करायचे म्हणून शेतात हरभरा पेरला होता. हरभऱ्याचे उत्पन्न हाती येण्यापूर्वीच रानडुक्करांनी हल्ला केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. गणेशला ४ भावंड असून हा घरची ९ एकर शेती व मक्त्याने १० एकर शेती करुन हरभरा पेरला होता. घटनास्थळावर शेलूबाजार पोलीस चौकीचे बिट जमादार मनवर तसेच वनविभागाच्या अधिकारी, कर्मचारयांनी भेट देवून पंचनामा केला.