लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : राज्याच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेत ३१ ऑगस्ट रोजी सुधारणा केली असून, यापुढे शेतकरी कुटुंबातील दोन सदस्यांना विमा संरक्षण मिळणार आहे.
शेती व्यवसाय करीत असताना वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचूदंश, विद्युत धक्का आदी नैसर्गिक आपत्तीमुळे होणारे अपघात, रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात तसेच अन्य कोणत्याही कारणांमुळे होणारे अपघात यामुळे शेतकऱ्यांचा मृत्यू ओढावतो किंवा काहींना दिव्यांगत्वही होऊ शकते. अशा परिस्थितीत अपघातग्रस्त शेतकऱ्यास किंवा त्याच्या पश्चात कुटुंबास आर्थिक लाभ देण्याकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत शेतकºयाचे कुटुंब विमा छत्राखाली येत नसल्यामुळे त्याच्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तीचा अपघाताने मृत्यू झाल्यास किंवा दिव्यांगत्व आल्यास विमा संरक्षण मिळत नाही. ही गैरसोय टाळण्यासाठी कृषी, पशुसंवर्धन विभागाने ३१ ऑगस्ट रोजी शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये बदल केला आहे. शेतकऱ्याच्या कुटुंबातील कर्त्या पुरूषाबरोबरच आणखी एका सदस्याला (जसे आई, वडील, पती/पत्नी, मुलगा व अविवाहित मुलगी यापैकी कोणतीही एक व्यक्ती) विमा संरक्षण मिळणार आहे.
कृषी गणना सन २०१५-१६ प्रमाणे निर्धारीत केलेल्या राज्यातील सुमारे १.५२ कोटी वहितीधारक खातेदार शेतकरी व वहितीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणताही एक सदस्य असे एकूण दोन जणांकरीता गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेंतर्गत लाभ मिळणार आहे. अपघाती मृत्यू झाल्या दोन लाख रुपये, अपघातामुळे दोन डोळे किंवा दोन हात किंवा दोन पाय तसेच एक डोळा, एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये, अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. या सुधारीत योजनेची अंमलबजावणी सप्टेंबर महिन्यापासून सुरू झाली आहे.
(प्रतिनिधी)