वाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक प्रशिक्षण मिळावे, शेतमालाची प्रतवारी करणे, फळे तांत्रिक पद्धतीने पिकवणे, शीतगृह साठवणूक आदी उद्देशाने पालकमंत्री शंभुराज देसाई यांच्या संकल्पनेतून वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात सर्व सुविधांनी युक्त असे स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र व शेतमाल विक्री केंद्राची उभारणी केली जाणार आहे. याकरिता राज्य शासनाच्या नियोजन विभागाने ५.४४ कोटी रुपये रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. या अनुषंगाने सार्वजनिक बांधकाम विभागाने आतापर्यंत केलेल्या कार्यवाहीचा आढावा पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी ३० एप्रिल रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वाकाटक सभागृहात झालेल्या बैठकीत घेतला.
स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र व शेतमाल विक्री केंद्राची उभारणी लवकरात लवकर होईल, यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने नियोजन करावे. या केंद्राचे प्रत्येक काम अतिशय गुणवत्तापूर्ण होणे आवश्यक आहे, अशा सूचना त्यांनी दिल्या. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी सुनील कळमकर यांनी स्व. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण केंद्र व शेतमाल विक्री केंद्राच्या उभारणीसाठी करण्यात येत असलेल्या कार्यवाहीची माहिती दिली.