.................
प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करा
किन्हीराजा : बंदी घातलेल्या प्लास्टिक पिशव्यांचा वापर होऊ नये, यादृष्टीने कार्यवाही करावी. नियमांची अंमलबजावणी करून प्लास्टिक पिशवीची विक्री अथवा वाहतूक होत असल्यास दंडात्मक कारवाई करावी, अशी मागणी मनसेने ग्रामपंचायतीकडे बुधवारी केली.
................
अरूंद रस्त्यावरून धावताहेत वाहने
वाशिम : पाटणी चौक ते अकोला नाका रस्त्याची दुरवस्था झाली आहे. यामुळे मधला मार्ग म्हणून वाहनधारकांनी मंत्री पार्कजवळून जनता बँकेजवळ निघणाऱ्या रस्त्याचा पर्याय निवडला आहे. मात्र, सदर रस्ता अरूंद असून, दुतर्फा घरे असल्याने लहान मुलांचा जीव धोक्यात सापडला आहे.
..................
निती आयोगाकडून मिळाल्या रुग्णवाहिका
जऊळका रेल्वे : आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत समाविष्ट असलेल्या वाशिम जिल्ह्याला निती आयोगाकडून मिळालेल्या निधीतून १० रुग्णवाहिका मिळाल्या. यामुळे अतिगंभीर रुग्णांची सोय झाल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांनी येथे बुधवारी सांगितले.
....................
ज्येष्ठांच्या रक्षणासाठी पोलिसांची विशेष मोहीम
मेडशी : मुले परगावी स्थायिक झाली असताना घरी एकाकी जीवन जगणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांच्या रक्षणासाठी जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पुढाकारातून विशेष मोहीम राबविली जात आहे. अधूनमधून पोलिसांचे पथक ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांची आस्थेने विचारपूस केली जाते.
...................
रस्ते कामांची चौकशी करण्याची मागणी
मानोरा : मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून तालुक्यात विविध ठिकाणी करण्यात आलेल्या रस्त्यांच्या कामांत अनियमितता झाली आहे. यासंदर्भात जिल्हा परिषद सदस्य उमेश ठाकरे यांच्यासह इतरांनी अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र, चौकशी झाली नाही. चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
................
महिलांच्या समस्यांवर मेळाव्यात चर्चा
मालेगाव : येथील तहसील कार्यालयाच्या सभागृहात सोमवारी लोकसंचालित साधन केंद्राच्यावतीने महिला मेळावा पार पडला. त्यात महिलांना जाणवणाऱ्या विविध समस्यांवर चर्चा करण्यात आली.
..............
धान्य पुरवठा करण्याची मागणी
वाशिम : नवीन शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठा करण्यात यावा, अशी मागणी येथील अविनाश मुळे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ यांच्याकडे १६ फेब्रुवारी रोजी पाठविलेल्या निवेदनात केली आहे.
.............
७४ हजार विद्यार्थ्यांना शिक्षण
वाशिम : शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील पाचवी ते दहावीपर्यंतच्या ९०७ शाळा सुरू करण्यात आल्या. ७४ हजार ७१० विद्यार्थ्यांना या माध्यमातून शिक्षण दिले जात आहे. मात्र, शिक्षक पॉझिटिव्ह आढळणे व काही शाळा निवासी असल्याने अद्याप काही शाळा सुरू होऊ शकल्या नाहीत.
.............
देपूळ परिसरात स्वच्छता अभियान थंडावले
देपूळ : परिसरातील अनेक गावांमध्ये स्वच्छता अभियान पूर्णत: थंडावले असून, निर्मल ग्राम योजना तथा संत गाडगेबाबा संपूर्ण स्वच्छता अभियान कागदोपत्रीच राबविले जात असल्याचे दिसून येत आहे.
................
कृषिपंपाच्या शेकडो जोडण्या प्रलंबित
वाशिम : कोटेशनचा भरणा करूनही अद्यापपर्यंत कृषिपंपाच्या शेकडो जोडण्या प्रलंबित आहेत. ही समस्या विनाविलंब निकाली काढून शेतकऱ्यांची गैरसोय दूर करावी, अशी मागणी मनसेचे मनीष डांगे यांनी महावितरणकडे सोमवारी निवेदनाव्दारे केली.
....................
अतिक्रमणांच्या सर्वेक्षणाकडे दुर्लक्ष
मंगरूळपीर : तालुक्यातील ग्रामीण भागात गायरान जमिनींवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी याकडे लक्ष पुरवून संबंधित यंत्रणेला सर्वेक्षणाचे आदेश द्यावे व अतिक्रमण हटविण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी मागणी दशरथ पवार यांनी सोमवारी निवेदनाव्दारे केली आहे.
...................
आधार नोंदणी केंद्र देण्याची मागणी
जऊळका रेल्वे : जऊळका रेल्वे परिसरात आधार नोंदणी केंद्राचा अभाव असल्याने शून्य ते सहा वर्षे वयोगटातील अनेक बालकांची आधार नोंदणी रखडली आहे. जऊळका जिल्हा परिषद गटात किमान एक आधार नोंदणी केंद्र देण्यात यावे, अशी मागणी पालकांनी मंगळवारी केली.