नुकतीच जमिनीवर आलेल्या पिकाची होत असलेली नासाडी कोरडवाहू शेतकरी उघड्या डोळ्याने पाहात आहेत. शेतातील कामधंदे बंद पडल्यामुळे ग्रामीण भागातील मजूर ठाण मांडून घरी बसला आहे. दररोज उजाडणारा दिवस पाण्याविना कोरडा जात असल्याने सर्वत्र चिंतेचे सावट पसरले आहे. येत्या चार-पाच दिवसात पावसाने हजेरी न लावल्यास अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीचा सामना करावा लागणार आहे. यंदा वेळेवरच मान्सूनचे आगमन होईल व तो सरासरीपेक्षा जास्त पडणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला होता. या अंदाजानुसार ७ ते १० जूनच्या दरम्यान मान्सूनच्या पावसाने सुरुवात करून दिली होती. त्यामुळे पावसाळा सुरू झाला असे समजून ९० टक्के शेतकऱ्यांनी पेरणी केली. परंतु ही पिके जमिनीवर येत नाही , तोच पावसाने दहा ते पंधरा दिवसांपासून दडी मारली आहे. त्यामुळे झालेली पेरणी धोक्यात सापडली आहे. तर पावसाअभावी अद्यापही काही पेरण्या रखडल्या आहेत. तर ज्या शेतकऱ्यांनी पावसाच्या भरवशावर पेरणी केली, अशा हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकांनी खाली माना टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच दररोज कडक उन्ह पडत असल्यामुळे जमिनीतील ओलावा नष्ट होत चालला आहे. पिकांना वाचवण्यासाठी अनेक शेतकरी पाणी देऊन पिकांना वाचवण्याची धडपड करत आहे. परंतु ज्यांच्याकडे पाण्याच्या व्यवस्था नाही, अशा शेतकऱ्यांना डोळ्यासमक्ष पिकाचे नुकसान पाहण्याशिवाय पर्याय उरला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्व सामान्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाळा सुरू होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटून गेला असताना पावसाने मात्र दडी मारली असल्याने शेतकरीवर्ग हवालदिल झाला आहे.
पावसाने दडी मारल्याने शेतकरीवर्ग हवालदिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 04, 2021 4:27 AM