अकोला : पश्चिम विदर्भात यावर्षी सरासरी कमी पाऊस झाल्याने खरीप पिकांच्या उत्पादनावर परिणाम होत आहे. त्यामुळे शेतकर्यांचे लक्ष रब्बी पिकांकडे लागले आहे. पण, रब्बी पिकासाठीही परतीच्या पावसावर अवलंबून राहावे लागणार असल्याने परतीचा पाऊस न आल्यास मात्र रब्बी हंगामातील पेरणी घटण्याची शक्यता आहे. २0१३-१४ मध्ये पश्चिम विदर्भात अतवृष्टी झाली. परतीच्या पावसानेही चांगलाच मुक्काम ठोकल्याने त्याचा फायदा रब्बी हंगामाला झाला होता. त्यामुळे पश्चिम विदर्भात गतवर्षी ८ लाख ४६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी शेतकर्यांनी केली होती. पण २0१४-१५ मध्ये पावसाने दडी मारल्याने रब्बी पिकांची पेरणी कमी म्हणजे ३0 ते ४0 टक्के क्षेत्रावरच केली होती. यावर्षी पुन्हा पावसाचा खंड पडला आहे. पावसाअभावी खरीप हंगामातील स्थिती वाईट असल्याने शेतकर्यांनी रब्बीचे नियोजन सुरू केले असले तरी डोळे मात्र परतीच्या दमदार पावसाकडे लागलेले आहेत. पश्चिम विदर्भातील शेतकरी रब्बी हंगामात सर्वाधिक हरभरा, तर पूर्व विदर्भात जवस या पिकाची पेरणी करतात. करडी, मोहरी व गहू या पिकांचा पेराही केला जातो. गहू पिकाला अलीकडे पाण्याची गरज असल्याने संरक्षित सिंचनाची ज्यांच्याकडे सोय आहे, ते शेतकरी गहू पेरणी करतात. तथापि, यंदा पश्चिम विदर्भातील काही धरणांमध्ये अल्प जलसाठा उपलब्ध आहे. नदी-नाल्यांचे पाणी संपूर्ण हंगामात पुरेल याची शाश्वती नसल्याने ओलिताचा गहू व इतर पिकांना पावसाची गरज आहे.
रब्बीचे स्वप्न
पाऊस नसल्याने खरिपातील सर्वच पिकांनी माना टाकल्या आहे. परिपक्वतेला आलेले पीक काळवंडले आहे. असे असले तरी आशादायी शेतकरी रब्बी पिकाचे स्वप्न बघत आहे. गेल्यावर्षी अनेक शेतकर्यांनी खरिपात शेती कोरडी ठेवली होती. यावर्षी पश्चिम विदर्भातील १0 टक्केच्यावर शेतकर्यांनी खरिपात पेरणी केलेली नाही, त्या सर्व शेतकर्यांची भिस्त रब्बी हंगामावर आहे.