खरीप हंगामातील पिके आता चांगली बहरत आहेत. मधल्या काळात पावसाने खंड दिला असताना सोयाबीन, उडीद, मूग आदी शेंगधारणेवर असलेल्या पिकांत विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे पिकांचे नुकसान होऊन उत्पादन घटण्याची भीती असल्याने शेतकरी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत. ही फवारणी करताना मात्र आवश्यक काळजी त्यांच्याकडून घेण्यात येत नाही. अशात त्यांना विषबाधा होऊन जीव धोक्यात येण्याची भीती आहे. त्यामुळेच एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंगीकार करून आवश्यक असेल तरच लेबल क्लेम शिफारशीत कीटकनाशकांचा योग्य फवारणी तंत्राद्वारे वापर करून किडींचे व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. तसेच तणनाशके फवारताना स्वतंत्र पंप वापरावा, अनेक रसायनाचे एकत्र मिश्रण करून फवारणी टाळावी, असा शास्त्रोक्त सल्ला कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना देण्यात येत आहे.
------
सोयाबीनवर शेंगा पोखरणारी अळी
खरिपातील सोयाबीन पीक शेंगधारणेच्या आणि शेंगा परिपक्वतेच्याही स्थितीत आहे. अशातच या पिकावर पाने खाणाऱ्या अळीसह शेंगा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे शेतकरी या किडींवर नियंत्रणासाठी कीटकनाशकांची फवारणी करीत आहेत.