वाशिम : ढगाळ वातावरणामुळे तुरीची कापणी करून शेतकऱ्यांनी तुरीच्या गंज्या लावून ठेवल्या आहेत. या गंज्यात विषारी साप आढळून येत आहेत. खाद्याचा शोध आणि वातावरणातील बदलामुळे विषारी साप तुरीच्या गंजीत तळ ठोकत असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन सर्पमित्र आणि वन्यजीव संघटनांकडून केले जात आहे.
खरीप हंगामातील विविध पिकांची कापणी करून शेतकरी सवडीनुसार त्या काढण्यासाठी या पिकांच्या गंज्या शेतात लावून ठेवतात किंवा कापणी केलेले पीक पूर्णपणे सुकण्याची प्रतीक्षा करतात. त्यातील पिकाची काढणी करण्यासाठी कधी शेतकऱ्यांना मळणी यंत्र मिळत नाही, तर कधी वातावरणाची साथ मिळत नाही. त्यामुळे अनेकदा या गंज्या १५ दिवसांपेक्षा अधिक काळ जागेवरच असतात. अशा गंज्यात सरपटणारे जीव तळ ठोकतात. त्यात प्रामुख्याने नाग आणि घोणस या विषारी सापांचा समावेश असतो. हे साप आपले खाद्य शोधण्यासह वातावरणापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी पिकांच्या गंज्यात शिरतात. सहसा साप एकाच ठिकाणी थांबत नसले तरी ते खाद्याच्या शोधात अशा गंजीकडे परत येण्याची शक्यता अधिक असते. या गंजीत आढळणारे किडे, उंदीर, बेडूक आदी प्राणी सापांना गंजीकडे आकर्षित करतात. सद्य:स्थितीत जिल्ह्यात ढगाळ वातावरणामुळे खोळंबलेल्या तूर काढणीला वेग आला असून, अनेक ठिकाणी तुरीच्या गंजीत विषारी साप आढळून येत आहेत. अशावेळी शेतकऱ्यांनी तुरीची गंजी काढताना लांब काठीचा आधार घेण्यासह इतर दक्षता बाळगावी, असे आवाहन मंगरूळपीर येथील निसर्ग स्पर्श फाउंडेशनचे सदस्य आणि सर्पमित्रांनी केले आहे.
----------
साप शेतकऱ्यांचा मित्रच, त्याला मारू नका !
पिकांच्या गंजीत विविध जातीचे साप वारंवार आढळून येतात. बरेचदा शेतकरी हा साप हुसकावून लावण्याऐवजी किंवा सर्पमित्रांचा आधार घेऊन त्याला अधिवासात सोडण्याऐवजी भीतीपोटी त्याला मारतात. प्रत्यक्षात ही कृती शेतकऱ्यांचेच नुकसान करणारी आहे, कारण शिवारात वावरणारे साप पिकांसाठी घातक असलेले उंदिर आणि इतर कीटक खाऊन आपली उपजीविका करतात. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे रक्षण होते, शिवाय जैवविविधता राखली जाते. त्यामुळेही शेतकऱ्यांना फायदाच होत असल्याने साप हा प्राणी शेतकऱ्यांचा मित्र आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी सापाला न मारता, सर्पमित्रांना कल्पना देऊन त्यांचा जीव वाचवावा, असे आवाहन वन्यजीव अभ्यासक गौरवकुमार इंगळे यांनी केले आहे.
===Photopath===
110121\11wsm_1_11012021_35.jpg
===Caption===
तुरीच्या गंजीत विषारी सापांचा तळ