वाशिम : पावसाळ्यात मानवी वस्तीसह शिवारात सापांचा संचार वाढतो. पावसाळा सुरू होण्याच्या काळात बऱ्याच जातीच्या सापांचा प्रजनन काळ असतो. त्याचबरोबर, सापांच्या बिळात पाणी शिरते. त्यामुळे भक्ष्य शोधण्यासाठी व लपण्यासाठी सुरक्षित जागेच्या शोधात साप जून ते ऑगस्ट या कालावधीत मानवी वस्ती, शेती पिकात वावरत असतात. अशात शेतात पिकांची पाहणी करताना आणि कामे करताना शेतकऱ्यांसह शेतमजुरांनी खबरदारी बाळगणे गरजेचे आहे.
मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात सर्वत्र सतत पाऊस पडत असल्याने सापांचा मानवी वस्तीसह शेतशिवारात संचार वाढला आहे. सद्य:स्थितीत पिके चांगली वाढली आहेत. शेतकरी पिकांत फवारणी करण्यासह निंदण, खुरपणाची कामे करीत आहेत. एखादवेळी भक्ष्याच्या शोधात पिकांत दडून बसलेल्या सापावर पाय पडल्यास तो दंश करण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे सापांपासून असलेला धोका लक्षात घेत, शेतकऱ्यांनी आवश्यक काळजी घेण्याचे आवाहन एम.एच. २९ हेल्पिंग हॅण्ड वाइल्ड ॲडव्हेंचर ॲण्ड नेचर क्लब यवतमाळच्या वाशिम शाखेचे जिल्हाध्यक्ष आदित्य इंगोले आणि त्यांच्या सहकारी सर्पमित्रांकडून करण्यात येत आहे.
शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावी१) शेतात फिरताना, फवारणी करताना लांब जाड बुटांचा वापर करावा.२) शक्यतो, यंत्राद्वारेच फवारणी करावी.३) पिकांत फिरताना जाड काठी, बूट आदळत जावे.४) हाताने पिकांची पाहणी करू नये, पिकांत खाली वाकू नये.५) साप दिसल्यास त्याला न डिवचता सर्पमित्राला कळवावे.६) जून ते ऑगस्टच्या दरम्यान सर्वाधिक सतर्कता बाळगावी.
जिल्ह्यात केवळ चारच प्रमुख विषारी सापभारतात सापांच्या विविध प्रकारच्या असंख्य जाती आढळून येत असल्या तरी देशभरात आढळणाऱ्या ५२ विषारी सापांपैकी केवळ चारच प्रमुख विषारी साप वाशिम जिल्ह्यात आढळून येतात. त्यात मण्यार, घोणस, फुरसे आणि नाग या सापांचा समावेश आहे. त्याशिवाय जिल्ह्यात पाच ते सहा प्रकारचे निमविषारी साप आढळून येतात. त्यामुळे सरसकट सर्वच साप विषारी समजणे चुकीचे आहे.