लोकमत न्यूज नेटवर्कपोहा (वाशिम) : सततची नापिकी व कर्जाला कंटाळून कारंजा तालुक्यातील पोहा येथील अल्पभूधारक शेतकरी भाऊराव सुर्यभान दहातोंडे (५५) यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीदरम्यान गळफास घेऊन आत्महत्या केली.भाऊराव दहातोंडे यांच्याकडे पत्नीच्या नावे केलेली २ एकर कोरडवाहु शेती आहे. या शेतीच्या भरवशावर ते कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. या शेतीसाठी त्यांनी बँक आॅफ बडोदाच्या कारंजा शाखेतून ३० हजार रुपये कर्ज घेतले होते. याशिवाय ग्रामीण बँक कारंजा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेचे कर्जही त्यांनी घेतले होते. यंदा शेतात पेरलेली कपाशी व सोयाबिनचे निसर्गाच्या अवकृपेने अतोनात नुकसान झाले. त्यामुळे बँकेचे कर्ज कसे फेडावे आणि कुटुंबाचा गाडा कसा ओढावा या चिंतेने त्यांना ग्रासले होते. या चिंतेतूनच त्यांनी १३ नोव्हेंबरच्या मध्यरात्री राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांचे पश्चात आई, पत्नी, दोन मुले, सून, एक मुलगी, नातवंड असा आप्त परिवार आहे.
कर्जाला कंटाळून पोहा येथील अल्पभूधारक शेतकऱ्यांची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 14, 2018 5:16 PM