लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : सोयाबीन, मूग, उडीद यासह अन्य शेतमालाची खरेदी करताना जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये हमीभावाचा नियम डावलला जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत आहे. याकडे जिल्हा उपनिबंधकांनी लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी ६ जानेवारी रोजी केली.जिल्ह्यात यंदा जवळपास पावणे तीन लाख हेक्टरवर सोयाबीनची पेरणी करण्यात आली होती. २०१९ मध्ये अल्प पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात प्रचंड घट आली. अवकाळी पावसामुळे सोयाबीन शेतमालाची प्रतवारी काही प्रमाणात घसरली आहे. यामुळे बाजार समित्यांमध्ये सरासरी ३५०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे. सोयाबीनला ३७१० रुपये प्रती क्विंटल, मूगाला ७०५० रुपये, उडदाला ५७०० रुपये प्रती क्विंटल असा हमीभाव आहे. बाजार समित्यांमध्ये ३५०० ते ३६०० रुपयादरम्यान सोयाबीनची खरेदी होत आहे. काही मोजक्याच सोयाबीनला ३७०० ते ३९०० रुपये भाव मिळत आहे. शेतकºयांकडून २०० ते ३०० रुपये प्रति क्विंटलमागे कमी दराने सोयाबीनची खरेदी केली जात असल्याने शेतकºयांचे आर्थिक नुकसान होत आहे. मूग, उडीद या शेतमालाची खरेदीही हमीभावापेक्षा कमी दराने होत आहे. यासंदर्भात जिल्हा उपनिबंधक रमेश कटके म्हणाले की याप्रकाराकडे लक्ष देऊन नियमाचे पालन करण्याच्या सूचना दिल्या जातील. (प्रतिनिधी)
शेतमाल हमीभावाच्या नियमाला कोलदांडा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 07, 2020 2:29 PM