लोकमत न्यूज नेटवर्कइंझोरी: किटकनाशकाच्या फवारणीमुळे इंझोरी येथील सहा मजुरांना विषबाधा झाल्याची घटना चार दिवसांपूर्वी घडली. या पृष्ठभुमीवर कृषी विभागाने जिल्हाभरात मार्गदर्शन मोहिम राबविणे आणि आरोग्य विभागाने इंझोरी येथे भेट देऊन पाहणी करणे गरजेचे होते; परंतु कृषी विभागाने जिल्हाभरात सोडाच इंझोरी येथेही भेट देऊन मार्गदर्शन करण्याची तसदी घेतली नाही, तर आरोग्य विभागाचा एकही कर्मचारी इंझोरीत अशा प्रकारच्या रुग्णांची तपासणी करण्यासाठी आला नाही. इंझोरी शिवारात सध्या पिकांवरील किड नियंत्रणासाठी शेतकऱ्यांकडून किटकनाशकांची फवारणी करण्यात येत आहे. आपले व परिवारांचे पोट भरण्याकरिता काही परिसरातील मजुर ठेका पध्दतीने ही कामे घेऊन ती कामे लवकर संपविण्याच्या दृष्टीने रात्रंदिवस काबाड कष्ट करीत आहेत. या मजुरापैकी सहा मजुरांना थकवा, उलटी, जेवण पाणी न पचणे आदिचा त्रास जाणवत असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे तपासणी केल्यानंतर फवारणीचे किटनाशक औषध शरीरात गेल्याने विषबाधा झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. यामध्ये नंदु श्रीकृष्ण काळेकर (२५), अश्विन दिलीप तायडे (२८), गोलु चंद्रभान लायबर (३०), कृष्णा पुंडलीक दिघडे (४०), चंदाबाई संजय दिघडे (४०) व जामदरा येथील गणेश धुरट (३५), या मजुरांचा समावेश आहे. यापैकी अश्विन तायडे, गोलु लायबर, व गणेश धुरट यांच्यावर अकोला व यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात आले. सहापैकी तीन मजुरांना चार दिवसांपूर्वीच रुग्णालयातून सुटीही देण्यात आली. त्यांची प्रकृतीही चांगली आहे. त्यानंतर दिलिप तायडे वगळता इतर दोघांच्या प्रकृतीतही सुधारणा झाली. अद्याप येथील काही मजुरांच्या ठेका पध्दतीने फवारणी सुरु असून, कदाचीत आणखी काही रुग्णांच्या संख्येमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आरोग्य विभागासह व कृषी विभागाने इंझोरी जिल्हाभरात फवारणीकरिता मार्गदर्शन करणे अपेक्षीत होते; परंतु चार दिवस उलटले तरी, कृषी विभागाची मार्गदर्शन मोहीम व्यापक झाली नाही इंझोरीतही या दोन्ही विभागाचा कर्मचारी चार दिवसांतही आला नाही.
इंझोरी येथील कृषी सहाय्यक आणि मंडळ कृषी अधिकारी हे नियमित गावांना भेटी देत असून, त्यांनी याबाबत मार्गदर्शनही केले आहे. याबाबत कृषी विभाग सजग आहे. त्यातच विषबाधा झाल्याची कोणतीही तक्रार मंडळ कृषी अधिकाऱ्यांकडे आली नाही. तथापि, शनिवारी सकाळी येथे मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात येईल.-सचिन कांबळे,तालुका कृषी अधिकारी, मानोरा