- सुनील काकडेलोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामात १०२५ कोटींचे पीक कर्ज वाटपाचे उद्दीष्ट ठरविण्यात आले आहे. दरम्यान, २८ जूनअखेर विदर्भ ग्रामीण कोकण आणि जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडून ७० टक्क्यांच्या आसपास पीक कर्ज वाटप झाले; मात्र राष्ट्रीयीकृत, खासगी बॅंकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण ४० टक्क्यांच्या आत आहे. या बॅंकांचे उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना कर्ज मिळत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात ११ राष्ट्रीयीकृत, ४ खासगी आणि दोन सहकारी तत्वावर चालणाऱ्या बॅंकांना १ लाख ४ हजार ७९१ शेतकऱ्यांना १०२५ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट देण्यात आले आहे. त्यात सर्वाधिक ६०५ कोटींचे उद्दीष्ट जिल्हा मध्यवर्ती बॅंकेला असून त्याखालोखाल विदर्भ कोकण ग्रामीण बॅंकेला ९५ कोटींच्या कर्जवाटपाचे उद्दीष्ट आहे. या दोन्ही बॅंकांनी शेतकऱ्यांचे हित जोपासत प्रत्येकी ७० टक्क्यांपेक्षा अधिक कर्ज वाटप केले; मात्र इंडियन बॅंक, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, सेंट्रल बॅंक ऑफ इंडिया, इंडियन ओव्हरसीज, पंजाब नॅशनल, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, यूको आणि यूनियन या ११ राष्ट्रीयीकृत बॅंकांना देण्यात आलेल्या ३०३ कोटींच्या कर्जवाटप उद्दीष्टापैकी आतापर्यंत केवळ ११० कोटींचे (३६ टक्के) कर्जवाटप केलेले आहे. ॲक्सीस, एचडीएफसी, आयसीआयसीआय आणि आयडीबीआय या चार खासगी बॅंकांना केवळ २२ कोटींचे कर्जवाटप उद्दीष्ट असताना केवळ ८.९१ कोटींचाच (४० टक्के) वाटप करण्यात आला.या संबंधित बॅंकांचे वारंवार उंबरठे झिजवूनही शेतकऱ्यांना अपेक्षित प्रतिसाद दिला जात नसून पीक कर्जापासून वंचित ठेवले जात असल्याचा सूर उमटत आहे. जिल्हाधिकारी, अग्रणी बॅंकेच्या व्यवस्थापकांनी याकडे लक्ष पुरवून शेतकऱ्यांना विनाविलंब कर्जपुरवठा होण्यासंबंधी संबंधित बॅंकांना सक्तीचे निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.
पीककर्ज वाटप बंद असल्याची बतावणीजिल्ह्यातील काही बॅंका पीककर्ज वाटप बंद असल्याची माहिती शेतकऱ्यांच्या देत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, असा उल्लेख नाबार्डचे शंकर कोकडवार यांनी २५ जून रोजी झालेल्या आढावा बैठकीत केला होता. बॅंकांनी चुकीची माहिती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये, अशा सूचना याप्रसंगी कोकडवार यांनी केल्या. यावरून संबंधित बॅंकांनी अंगीकारलेली चुकीची भूमिका यानिमित्ताने उघड झाली आहे.
गत आठवड्यात जिल्ह्यातील सर्व खासगी, राष्ट्रीयीकृत, सहकारी बॅंकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन खरीप हंगामात शेतकऱ्यांना पीककर्ज वाटपाचे प्रमाण वाढविण्याचे निर्देश दिले. पालन न केल्यास कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. बॅंकांनी ही बाब गांभीर्याने घेऊन पीककर्ज वाटपास प्राधान्य द्यावे.- शन्मुगराजन एस.जिल्हाधिकारी, वाशिम