शिरपूर जैन : रब्बी हंगाम जवळपास संपुष्टात आला असून, शेतातील कामे संपल्याने मालेगाव ते रिसोड या मार्गावरील शेतकरी, शेतमजुुरांनी रसवंतीची कास धरली आहे. ४५ किलोमीटरच्या रस्त्यावर सुमारे ५० रसवंत्या सध्या सुरू झाल्याचे दिसून येत आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या निर्मितीमुळे रोजगाराचीही निर्मिती झाल्याचा सूर यानिमित्ताने उमटत आहे.
गत तीन वर्षांपासून मालेगाव - शिरपूर - रिसोड - सेनगाव - हिंगोली या ९७ किलोमीटर अंतराच्या रस्त्याचे रुंदीकरण सुरू होते. जवळपास ५०० कोटी रुपये खर्च करून या महामार्गाचे काम आता पूर्ण झाले आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देऊन ४६१ बी हा क्रमांक देण्यात आला आहे. रस्त्याचे रुपडे पालटल्याने पूर्वीपेक्षा अधिक रहदारी वाढली आहे. ही बाब हेरून मालेगाव ते रिसोड यादरम्यान आसपासच्या गावांमधील शेतकरी, शेतमजुरांनी जवळपास ५० ते ६० रसवंती लावल्या आहेत. यासह चहाची दुकाने, लहान-मोठी हॉटेल, सिंचन सुविधा असलेल्या बहुतांश शेतकऱ्यांनी ‘सर्विसिंग सेंटर’ उघडली आहेत. रस्ता विकासामुळे मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार व शेतकऱ्यांना संलग्न व्यवसाय निर्मिती झाल्याचे चित्र मालेगाव - रिसोड रस्त्यावर पाहायला मिळत आहे.
..................................
कोट :
शिरपूरपासून हिंगोलीपर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण होऊन या रस्त्याला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा मिळाला. वाहनांची संख्या व रहदारी वाढल्याने व्यवसाय होईल, या उद्देशाने रसवंती आणि वाहने धुण्याचे ‘सर्विसिंग सेंटर’ सुरू केले आहे. गेल्या काही दिवसांपासून व्यवसायातून चांगली मिळकत होत आहे.
वैभव नारायण चोपडे
शेतकरी, शिरपूर जैन