लोकमत न्यूज नेटवर्ककारंजा लाड :मागील वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कडधान्याचे उत्पादन वाढविण्यासाठी शेतकऱ्यांना आवाहन केले आणि शेतकऱ्यांनी त्या आवाहनाला प्रतिसाद देत तुरीच्या पेऱ्यात वाढ केल्याने देशासह राज्यात तुरीचे पीक आले. परिणामी, बाजारात मागील वर्षीच्या तुलनेत तिपटीने भाव पडले. शेतकऱ्यांची व्यथा शासनाने जाणून घेत आधारभूत किमतीवर नाफेडची तूर खरेदी सुरू केली; परंतु उद्दिष्टापेक्षा जास्त तूर खरेदी झाल्याने या ना त्या कारणाने वेळोवेळी नाफेड खरेदी बंद पडली. शासनाने तुरीच्या शेवटच्या दाण्यापर्यंत शासन तूर खरेदी करेल. या वचनाची शेतकऱ्यांची आपल्या आंदोलनातून आठवण करून दिल्यानंतर कारंजा येथील नाफेड तूर खरेदी केंद्रावर २२ मेपासून टोकन वाटपास सुरुवात करण्यात आली. २२ व २३ मे रोजी पोलीस बंदोबस्तात कारंजा केंद्रावर सुमारे दोन हजार शेतकऱ्यांनी टोकन घेण्यासाठी गर्दी केल्याने एकच झुंबड उडाली. कारंजा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने उन्हापासून शेतकऱ्यांचे संरक्षण व्हावे, याकरिता शामियाना व थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.
केंद्रावर टोकनसाठी शेतकऱ्यांची झुंबड
By admin | Published: May 24, 2017 1:50 AM