वाशिम :शासनाच्यावतिने राबविण्यात येत असलेल्या खरिप हंगाम २0१५ राष्ट्रीय कृषी विमा योजनेसाठी ३१ जुलै शेवटच्या दिवशी शेतकर्यांनी एकच झुंबड केली होती. जिल्हयात शेवटच्या दिवशी शेकडो शेतकर्यांनी पीक विमा काढला. अनेक गावात अर्ज भरुन देण्यासाठी तलाठी उपलब्ध न झाल्याने शेतकर्यांना त्यांच्या शोधासाठी वणवण भटकावे लागले. २0१0 ते २0१२ या वर्षात शेतकर्यांचा पीक विमाकडे कल अत्यल्प असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. गत दोन वर्षांपासून होणारे नुकसान पाहता गतवर्षीपासून यामध्ये मोठया प्रमाणात वाढ झाल असून २0१३ मध्ये १ लाख १६ हजार शेतकर्यांना ५७ कोटी रुपयांच्या विम्याचा लाभ झाला आहे. विदर्भातील सहाही आत्महत्याग्रस्त जिल्हयात पीक विमा योजनेच्या हप्त्यात ५0 टक्के सुट दिली असल्याने प्रत्येक शेतकर्याने पीक विमा काढण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हयात ८0 ते ८५ टक्के शेतकर्यांनी पीक विमा काढल्याचे कृषी विभागाचे म्हणणे आहे. कारंजा शहरात पिक विमा काढण्याच्या शेवटच्या तारखेपर्यंत जवळपास ३ हजार ९00 शेतकर्यांनी पिकविम्याची अर्ज केल्याचे शहरातील बँकांमधून घेतलेल्या आकडेवारीवरून दिसत आहे. मानोरा तालुक्यात जवळपास १६ हजार शेतकर्यांनी पिक विम्यासाठी अर्ज केल्याचे कृषी अधिकारी कार्यालय, तसेच विविध बँकतील आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. रिसोड तालुक्यातील १0 पेैकी ८ बँकेतील शाखेमध्ये आजपर्यंत १३ हजार ९१४ शेतकर्यांनी पीक विमा काढला. यामध्ये हराळ, रिठद, वाकद, चिखली, मांगुळ झनक, मोप, रिसोड व केनवडचा समावेश आहे.
शेवटच्या दिवशी पीक विम्यासाठी शेतक-यांची ‘झुंबड’
By admin | Published: August 01, 2015 12:02 AM