खरीपाची तयारी: काडीकचरा वेचणीसह नांगरणीची लोकमत न्यूज नेटवर्क इंझोरी ( वाशिम ) : उन्हाळा अर्ध्यावर आला असताना खरीपाच्या तयारीसाठी शेतकऱ्यांनी लगबग सुरू केली आहे. तथापि, मजुरांचा तुटवडा भासत असल्याने अनेक शेतकरी घरच्या महिला मंडळीचा आधार घेऊनच ही कामे करीत असल्याचे चित्र मानोरा तालुक्यातील इंझोरी, वाकी शिवारासह सर्वत्र पाहायला मिळत आहे.खरीपाच्या हंगामात तणाची वाढ होऊ नये, किटकांचे कोष नष्ट व्हावे. जमिनीचा कस वाढविण्यासाठी सेंद्रिय खताची मात्रा टाकता यावी म्हणून शेतकºयांनी शेतजमिन साफ करून नांगरणीची कामे सुरू केली आहेत. त्यासाठी मजुरांची शोधाशोध सुरू आहे; परंतु यंदाही जिल्ह्यात दुष्काळी स्थिती निर्माण झाली असून, रिसोड तालुक्यात शासनाने दुष्काळ जाहीरही केला आहे, तर मानोरा तालुक्यातील उमरी खु. मंडळातही दुष्काळ जाहीर केला आहे. तथापि, कमी अधिक प्रमाणात जिल्हाभरातच दुष्काळाच्या झळा पसरल्याचे दिसत असून, रोजगाराचा प्रश्न गंभीर झाल्याने शेतमजूर परिवारासह परराज्यात रोजगारासाठी गेले आहेत. ही मंडळी अगदी खरीपाच्या सुरुवातीलाच परतणार असल्याने जिल्ह्यात मजुरांची वाणवा निर्माण झाली आहे. मानोरा तालुक्यात हे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे शेतकºयांना मजूर मिळेनासे झाले आहेत. परिणामी खरीपासाठी शेतजमीन तयार करण्यासाठी शेतकरी स्वत: राबण्यासह घरच्या महिला मंडळीचा काडीकचरा वेचणी व इतर कामांसाठी आधार घेत आहेत.
रखरखत्या उन्हात महिलांचे श्रमगावात शेतमजूर मिळत नसल्याने शेतीची कामे रखडली जाऊन खरीप हंगामावर त्याचा परिणाम होऊ नये, ही बाब शेतकरी वर्गाला त्रस्त करीत आहे. घरधन्यांची ही पंचाईत लक्षात घेऊन महिला मंडळीने शेती मशागतीच्या कामांत हातभार लावण्यास पुढाकार घेतला असून, रखरखत्या उन्हात अनेक ठिकाणी महिला स्वत:च्या शेतीतच काडी कचरा वेचून त्याची विल्हेवाट लावताना दिसत आहेत. पुढील महिनाभर रखरखत्या उन्हातच त्यांना शेतीसाठी राबावे लागणार आहे.