गतवर्षीच्या खरीप हंगामात अती पावसाने काढणीला आलेला मुंग, उडीद, सोयाबीन आदि पिके सडली. काजळेश्वरसह उकर्डा, पानगव्हाण, उजळेश्वर, पलाना, खांदला, विराहीत, जानोरी, धानोरा, पारवा, महागाव आदि गावांतील हजारो शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीचा फटका बसला. या शेतकऱ्यांनी मुंग, उडीद, सोयाबीनसह इतर पिकांचा विमाही काढला होता. त्यामुळे झालेल्या नुकसानापोटी त्यांना विमा भरपाई मिळणे अपेक्षित होते. यासाठी त्यांनी पीकविमा कंपनीकडे रितसर अर्जही केले; परंतु प्रत्यक्ष पाहणी करूनही जानेवारी महिना संपत आला तरी शेतकऱ्यांना खरीप पीक विम्याचा लाभ मिळाला नाही. कृषी विभाग आणि जिल्हा प्रशासनाने याची दखल घेऊन शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळवून द्यावा, अन्यथा लोकशाही मार्गाचा अवलंब करून आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी तथा ग्रामपंचायत सदस्य नितीन उपाध्ये यांनी दिला आहे.
---
कोट: पंतप्रधान पीकविमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन कृषी विभागाकडून गाजावाजा केल्या जाते. लाखो शेतकरी या आवाहनाला प्रतिसाद देत कोट्यवधी रुपये भरून पिकांना विमा कवच देतात; परंतु प्रत्यक्ष नुकसान होऊनही पीकविमा कंपन्या हात आवरत असतील, तर शेतकऱ्यांना लुटण्याचा हा व्यवसाय तर नाही ना, अशी शंका येत आहे. काजळेश्वर परिसरातील पीकविमाधारक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन, मुंग उडीद कापूस या पिकांचे अतोनात नुकसान होऊनही त्यांना कवडीचाही विमा मिळाला नाही. याची दखल तातडीने घ्यावी.
-नितीन उपाध्ये, शेतकरी काजळेश्वर